दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढते आहे. पिके हातची गेली आहेत. अशा अवस्थेत सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत हताश होत मराठवाडयातील १५२ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यातील ७२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या सावकाराचा जाच व नापिकीमुळे झाल्याचे सरकारदरबारी निष्कर्ष आहेत.
या वर्षी खरिपासाठी शेतकऱ्यांना पुरेसे कर्ज न मिळाल्याने सावकाराच्या दारात उभे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. वाढत गेलेले कर्ज व नापिकी यामुळे शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. मराठवाडय़ात सर्वाधिक ६८ आत्महत्या एकटय़ा बीड जिल्हयात नोंदविल्या गेल्या आहेत. या जिल्हयातील आष्टी व पाटोदा तालुक्यांत या वर्षी पुन्हा तीव्र दुष्काळ आहे. दुष्काळाची गडद छाया असणाऱ्या उस्मानाबादेत २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नांदेड व हिंगोलीत प्रत्येकी ३, तर परभणीत २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच असले, तरी त्यावर दीर्घकालीन उपाययोजनांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या समित्यांच्या बैठकाही वेळेवर होत नसल्याचे अधिकारीच सांगतात. उस्मानाबाद, बीड व जालना जिल्हा बँकांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षी कर्ज मिळालेच नाही. परिणामी, काही खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांना अधिक व्याजदराने कर्ज दिले. त्याची वसुली सक्तीने केली जाते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी या वर्षी खासगी सावकारांचे उंबरठे झिजविले. सावकारी कचाटय़ात अडकलेल्या शेतकऱ्यांनी जीवनयात्राच संपविली. ज्या भागात अधिक तीव्र दुष्काळ आहे त्याच बीड व उस्मानाबाद जिल्हयांत आत्महत्यांचे प्रमाणही अधिक आहे.