राज्यातील परवानाधारकांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, वाहतूक रिबेट प्रश्न यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी २० फेब्रुवारीपासून राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार बेमुदत संपावर जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. या आशयाचे निवेदन अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.      
निवेदनात राज्यातील धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अन्न सुरक्षा कायद्यानुसार शहरी भागात ५५ टक्के अपात्र, ग्रामीण भागात २४ टक्के, धान्य  दुकानांपर्यंत पोहोच करावे अथवा वाहतूक भाडे वाढवून द्यावे, धान्याची वेळेवर उपलब्धता न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, रास्त भाव दुकानदारांच्या परवान्यांचे नूतनीकरण करून त्यांच्या वारसांचे नाव लावावे, १४ जीवनावश्यक वस्तू शिधापत्रिकेवर उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे, असे निवेदनात स्पष्ट केले आहे.
या वेळी चंद्रकांत यादव, शौकत महालकरी, रवींद्र मोरे, अरुण शिंदे, राजेश मंडलिक आदींसह रास्तधान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक उपस्थित होते.