रयत शिक्षण संस्थेची स्थापना व कार्य जरी प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात असले तरी या संस्थेचे अप्रूप अवघ्या महाराष्ट्राला आहे. सोमवारी निधन झालेले रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांचे कर्मयोगी बाबा आमटे व आनंदवनाशी विशेष मैत्र होते व आयुष्यभर त्यांनी ते जाणीवपूर्वक जपले. आनंदवनातील रहिवाशांनी तयार केलेल्या वस्तू स्वत: वापरून व इतरांना त्यासाठी प्रेरित करून त्यांनी एक वेगळाच ‘श्रीरामपूर पॅटर्न’ निर्माण केला होता. या शिवाय, पारदर्शक कारभारासाठी प्रसिध्द असणाऱ्या शेगाव संस्थानचे अध्यक्ष शिवशंकर पाटील यांच्याशी त्यांचा वैचारिक पिंड जुळलेला होता. 

कर्मयोगी बाबा आमटे असतानापासून रावसाहेबांचा त्यांच्याशी व आनंदवनाशी घनिष्ठ संबंध होता आणि बाबा गेल्यानंतरही तो त्यांनी आवर्जून जपला होता. विकास आमटे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना शिंदेशी निगडित आठवणींना उजाळा दिला. रावसाहेब शिंदे यांचा बाबांशी व आनंदवनाशी ४० वर्षांचा संबंध होता. व्यक्तिगतरीत्या व संस्थात्मक जीवनातही ते आनंदवनाशी जुळले होते. आनंदवनात राहणारे कुष्ठरोगी व इतरांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ते श्रीरामपूरला आयोजित करीत असत. या प्रदर्शनात होणाऱ्या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारा निधी ते आनंदवनात पाठवत असत. स्वत:च्या आयुष्यात त्यांनी आनंदवनात तयार झालेल्या वस्तू तर वापरल्याच शिवाय मंगलकार्यातही ते आनंदवनातील वस्तू भेट देत असत. आनंदवनाशी जोडलेला एक वेगळाच श्रीरामपूर पॅटर्न त्यांनी निर्माण केला होता, असे आमटे म्हणाले. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाल्यावर व वयोमानामुळे त्यांचे आनंदवनात येणे कमी झाले होते. अलीकडे मी त्यांना जाऊन भेटत असे. मात्र, शेवटपर्यंत त्यांचा आनंदवनाप्रती लोभ कायम होता, अशा भावना आमटे यांनी व्यक्त केल्या.
आनंदवनाइतकाच रावसाहेबांचा शेगाव संस्थान व तेथील अध्यक्ष शिवशंकर पाटील यांच्याशी जिव्हाळयाचा संबंध होता. रावसाहेबांची व माझी वैचारिक बैठक एकच होती व मन विचलित झाले की मी त्यांच्याशी बोलत असे. ध्येयवाद किंवा जीवनातील मार्गदर्शक तत्वे याबद्दल अत्यंत अनुभवी असलेल्या या माणसाचे विचार फारच प्रगल्भ होते. दर २-३ महिन्याला ते शेगावला येत असत. येथील कार्यपध्दतीबद्दल त्यांना कुतूहल होते. अनेक वेळा आम्ही गप्पा मारत बसत असू. एक महिन्याआधी ते तीन दिवसांकरिता शेगावला येऊन गेले होते. येताना ते कुणातरी ध्येयवादी व्यक्तिला बरोबर घेऊन येत. त्यांनी माझा व बाबा आमटेंचा परिचय करून दिला होता तर मी त्यांना तुकारामदादा गीताचार्याची ओळख करून दिली होती. रयतचे काम करताना त्यांनी कधीही संस्थेकडून एक पैसा घेतला नाही. मात्र, अलीकडे शिक्षण क्षेत्रात आलेल्या वाईट प्रवृत्तींमुळे ते नाराज असत. रयतचे काम त्यांनी सोडू नये असा आग्रह मी त्यांना धरला होता, असे पाटील यांनी सांगितले. नुकतेच त्यांचे पत्र आले होते व कालच मी उत्तरही लिहून ठेवले होते. मात्र, पत्र पोस्टात टाकण्याआधीच ही वाईट बातमी आली. रयतची धुरा यशस्वीपणे वाहणारा ध्येयवादी माणूस गेला, अशा शब्दात त्यांनी रावसाहेब शिंदे यांना आदरांजली वाहिली.