‘चेस द एक्सलन्स, सक्सेस विल फॉलो’ अर्थात ‘काबील बनो, कामयाबी आपके पिछे आयेगी..’ अशा प्रकारचा प्रेरणादायी संदेश देणारी ‘थ्री इडियट’ चित्रपटातील अभिनेता अमीर खानने साकारलेली भूमिका ज्या व्यक्तीवरून बेतली आहे, त्यांना साक्षात भेटण्याची, त्यांचे विचार ऐकण्याची संधी ठाणेकरांना यंदाच्या वेध व्यवसाय परिषदेत मिळणार आहे. त्यांचे नाव आहे सोनम् वांगचुक. चित्रपटात रँचो नावाने सुपरिचित प्रत्यक्षातील सोनम् वांगचुक यांनी लडाखमध्ये शैक्षणिक संस्था उभारून तेथील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
 ‘इच्छा ते पूर्ती’ या सूत्राभोवती गुंफलेली यंदाची वेध परिषद शुक्रवार, १२ ते रविवार १४ डिसेंबरदरम्यान समर्थ सेवक मंडळाचे पटांगण, हुनमान व्यामशाळा, गडकरी रंगायतन समोर, ठाणे येथे होणार आहे. ज्येष्ठ तंत्रज्ञ विवेक सावंत, अभिनेता सचिन खेडेकर, गायक आणि नकलाकार सुदेश भोसले, भटनागर पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ संजीव लगांडे, डॉ. अभिषेक सेन, सुनील खांडबहाले, सुश्रुत मुंजे, देवव्रत जातेगावकर अशा मान्यवरांची मांदिआळी यंदाच्या वेध परिषदेच्या निमित्ताने ठाणेकर रसिकांना अनुभवता येणार आहे.
संस्कारक्षम मूल्यांची जोपासना करणारी चळवळ अशी ओळख असलेल्या २३ व्या वेध परिषदेस १२ डिसेंबरपासून सुरू होणार असून यंदाच्या ‘इच्छा ते पूर्ती’ या सूत्राला अनुसरून ज्येष्ठ तंत्रज्ञ विवेक सावंत यांच्या बिजभाषणाचे परिषदेचे उद्घाटन होणार आहे. विवेक सावंत हे ‘परम’ हा भारतीय महासंगण तयार करणाऱ्या संघातील ज्येष्ठ तंत्रज्ञ होते. एमकेसीएल अर्थात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड या उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक असलेले विवेक सावंत सामाजिक भान असलेले बहुश्रुत व्यक्तिमत्त्व आहे. मात्र यंदाच्या ‘वेध’चे सर्वात मोठे आकर्षण असणार आहे ते म्हणजे खऱ्या खुऱ्या ‘फुंकसुक वांगडू’ ऊर्फ रणछोडदास चांचड यांचे. संशोधक    असणाऱ्या वांगचुक यांनी आगळीवेगळी पर्यावरणप्रेमी शाळा सुरू करून लडाखमध्ये शैक्षणिक क्रांती केली. टाइम मॅगेझीनने त्यांची निवड जगातील पन्नास प्रभावी संशोधकांमध्ये केली तर दि विकने मॅन ऑफ द इयर म्हणून त्यांचा गौरव केला. या उमद्या व्यक्तिमत्त्वाचे विचार ऐकण्याची संधी ठाणेकरांना या परिषदेत मिळणार आहे.
त्याचबरोबर ‘आयपीएच’च्या वतीने आयोजित वेध परिषदेत यंदा ज्येष्ठ कलाकार सचिन खेडेकर, गायक आणि नकलाकार सुदेश भोसले, भटनागर शास्त्रज्ञ पुरस्कारविजेते डॉ. संजीव गलांडे, भारतीय ग्रामीण महिलांची माणदेश महिला बँक आणि महिला उद्योजक संस्था चालवणाऱ्या चेतना गाला-सिन्हा उपस्थित राहणार आहेत तर तरुणांच्या सत्रामध्ये सुईच्या टोचणीशिवाय रक्तातले हिमोग्लोबिन दर्शवणारे यंत्र निर्माण करणारे एमबीबीएस डॉक्टर अभिषेक सेन, विविध भाषांचा वेध घेणारे जगातील अग्रगण्य संकेतस्थळ निर्माण करणारे सुनील खांडबहाले, स्वच्छता आणि टापटीप या गोष्टींवर आधारित कंपनीचे निर्माते सुश्रुत मुंजे आणि पाकशास्त्र ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या लोकप्रिय शेफ देवव्रत जातेगावकर यांचे प्रात्यक्षिक आणि गप्पांचा कार्यक्रम यंदाच्या वेधमध्ये असणार आहे.
‘ती’ची कथा निराळी..
यंदाच्या वेधमध्ये कर्तृत्ववान महिलांचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले असून ‘तिची कथाच निराळी’ या शीर्षकांतर्गत तीन कर्तृत्ववान महिलांची ठाणेकरांना ओळख होणार आहे. एक सामान्य गृहिणीपासून ते कार्यतत्पर शासकीय अधिकारी झालेल्या संगीता धायगुडे यांची कथा त्यांच्याच शब्दात अनुभवता येणार आहे. डॉक्टरकी केल्यानंतर कोडामुळे आयुष्य होरपळून निघालेल्या मात्र त्यातून सावरून यशस्वी सर्जन होण्याबरोबरच कोडग्रस्थांसाठी ‘श्वेता’ हा आधारगट काढणाऱ्या आणि ‘नितळ’ चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या डॉ. माया तळपुळेंकर या वेधमध्ये संवाद साधणार आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने मुंबईत कचरा वेचणाऱ्या महिलांच्या अनुभवांवर आधारित एक वेगळे सत्र होणार असून कचऱ्यातून उभे राहून आयुष्याला आकार देणाऱ्या जिवंत कहाण्या, स्वच्छतेचे महत्त्व आणि सूचना मांडणाऱ्या महिलांचे जीवन अनुभवता येणार आहे, अशी माहिती आयपीएचचे डॉ. अनंत नाडकर्णी यांनी दिली.