महापौरांच्या विरोधात आक्रमक होऊन सभागृहात गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसमध्ये फूट पडू लागली असून त्याचा प्रत्यय पालिकेच्या आर-दक्षिण प्रभाग समितीच्या उमेदवारीवरून आला आहे. आर-दक्षिण प्रभाग समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरविलेल्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध काँग्रेस नगरसेवक योगेश भोईर यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केला आहे.
आर-दक्षिण प्रभागामध्ये काँग्रेसचे सहा, भाजपचे तीन आणि शिवसेनेचे दोन असे नगरसेवकांचे संख्याबळ असून या प्रभाग समितीची निवडणूक येत्या सोमवारी होत आहे. प्रभाग समिती निवडणुकीसाठी काँग्रेसने नगरसेविका नेहा पाटील यांना उनेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने प्राजक्ता सावंत (विश्वासराव) यांना रिंगणात उतरविले आहे. संख्याबळ पाहता नेहा पाटील यांचा विजय निश्चित वाटत होता. मात्र नेहा पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले काँग्रेसचे नगरसेवक योगेश भोईर यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. योगेश भोईर यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसमध्ये गोंधळ उडाला आहे. संख्याबळ पाहता काँग्रेसचा विजय निश्चित होता. मात्र काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाल्यास प्राजक्ता सावंत (विश्वासराव) यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होणार आहे.
दरम्यान, योगेश भोईर हे रमेशसिंग ठाकूर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी योगेश भोईर यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आलेले नाही. त्यामुळे नेहा पाटील यांना मतदान करण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांवर व्हीप जारी करण्यात आला आहे.