रेड स्वस्तिक सोसायटी या सेवाभावी संस्थेतर्फे मुंबईच्या (नेरूळ) शृश्रृषा हार्ट केअर सेंटर व मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या सहकार्याने २१ सप्टेंबरला नागपुरात शस्त्रक्रियापूर्व हृदयरोग तपासणी महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सुभाष मार्गावरील गुरुदेव सेवा मंडळात आयोजित या महाशिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विकास बिसने यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर, मुंबईचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संजय तारलेकर व डॉ. अविनाश भोसले याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहतील. सकाळी नऊ वाजता आयोजित या महाशिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. मिलिंद नाईक, सुरेंद्र मनपिया, डॉ. रोहित कळमकर, जगन्नाथ गराट, किसन बेरिया, लक्ष्मण शुक्ला आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
या महाशिबिरात रक्तदाब, रक्त तपासणी, ईसीजी व हृदयरोग या तपासण्या नि:शुल्क होतील. नोंदणी नि:शुल्क होईल. यापूर्वी केलेल्या तपासण्यांची फाईल सोबत आणावी. पिवळे व केशरी रेशन कार्ड, राजीव गांधी जीवनदायी योजना कार्डधारकांना हृदयरोग शस्त्रक्रिया, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, स्ट्रेसटेस्ट नि:शुल्क केल्या जातील. त्यामुळे हे कार्ड सोबत आणावे. शिबिरात निवड झालेल्या लाभार्थ्यांचे पुढील उपचार व शस्त्रक्रिया मुंबईच्या (नेरूळ) शृश्रृषा हार्ट केअर सेंटर व मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात होतील.
रेड स्वस्तिक सोसायटीच्या स्थापनेला १२ जानेवारी २०१४ रोजी तेरा वर्षे पूर्ण झाली आहेत. विविध प्रकल्पांद्वारे गरजू व वंचितांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न संस्थेतर्फे निरंतर केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून प्रयाग व अलाहाबाद येथे झालेल्या महाकुंभमेळ्यात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. डॉक्टर्स व वैद्यकीय चमूने यात योगदान दिले. सव्वापाच लाख श्रद्धाळूंनी त्याचा लाभ घेतला. उत्तराखंड व केदारनाथ महाप्रलयातील पीडितांच्या मदतीसाठी संस्था धावून गेली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मदतीसाठी स्वत:ला झोकून दिले. सहा हजार पीडितांना ब्लँकेट्स, अन्न, औषधे व दैनंदिनी गरजेच्या वस्तू त्यांना पुरविण्यात आल्या. ओदिशातील १८ हजार वादळग्रस्तांना ब्लँकेट्स, अन्न, औषधे व दैनंदिनी गरजेच्या वस्तू पुरविण्यात आल्या. संस्थेच्या नागपूर शाखेतर्फे गेल्यावर्षी शहरातील विविध मागासवस्त्यांमध्ये तसेच हुडकेश्वर मार्गावरील विशेष मुलांच्या प्रमेष्टी स्कूलमध्ये आरोग्य तपासणी, औषधे वितरण, मोतीबिंदू शस्त्रक्रिया घेतल्या. १ हजार ९१३ गरजूंनी त्याचा लाभ घेतला.
संस्थेतर्फे वृद्ध व निराधारांसाठी ‘शिवालय’ आधारगृह उभारले जात असून शंभर निराधारांना तेथे आसरा दिला जाईल. ‘सेवा ही धर्म है’ हे संस्थेचे ब्रिद असून मागील तेरा वर्षांत संस्थेच्या साठ शाखा कार्यरत आहेत. त्या माध्यमातून आतापर्यंत शहरी, ग्रामीण व अतिदुर्गम भागातील ४६ लाख ३१ हजार ४३० गरजूंची सेवा करणे शक्य झाले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पटेल यांनी दिली. सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी टी.एस. भाल संस्थेचे संस्थापक आहेत. एच एफ जे पत्रावाला, सुरेश कोटे हे उपाध्यक्ष असून त्यांच्यावर अनुक्रमे वित्त व प्रशासनाची जबाबदारी आहे. बिपीन पटेल व्यवस्थापकीय संचालक तर अशोक शिंदे सहव्यवस्थापकीय संचालक आहेत. आवाहन पीठाधीश्वर स्वामी डॉ. शिवेंद्र पुरी संस्थेचे मुख्य पालक तर विशाद मफतलाल, राधेश्याम चांडक, नारायणदास मानधना, आर. आर. चोखाणी, विश्वनाथ अग्रवाल, रतिलाल आखाणी, श्यामलाल खेमका, एनबीएच कुळकर्णी, एम.पी. मानसिंघका, सुरेश गग्गर व नारायणदास सराफ पालक आहेत. संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेत एकूण ५२ जणांचा समावेश आहे.