पूर्व प्राथमिक शाळेत प्रवेश घेतल्यानंतर अवघ्या सहा दिवसांनीच प्रवेश रद्द केलेला असताना आणि कुठल्याही सुविधांचा लाभ घेतलेला नसतानाही प्रवेश शुल्क परत करण्यास नकार देणे दक्षिण मुंबईतील एका पूर्व प्राथमिक शाळेला महागात पडले आहे. प्रवेश शुल्काचे ३० हजार रुपये सहा टक्के व्याजाने देण्यासह मानसिक त्रासासाठी अतिरिक्त पाच हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने या पूर्व प्राथमिक शाळेला दिले आहेत.
मलबार हिल येथील प्रकाश सेठ यांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलाच्या प्रवेशासाठी ‘टेंडर टाइम्स प्रीस्कूल अ‍ॅण्ड अ‍ॅक्टिव्हिटी’ या शाळेत अर्ज केला होता. त्यांच्या मुलाला रणवीरला शाळेत प्रवेश देण्यात आल्यावर प्रवेश शुल्कापोटी सेठ यांनी ३० हजार रुपये भरले होते. सेठ यांच्या तक्रारीनुसार, प्रवेशानंतर अवघे सहा दिवस रणवीर शाळेत गेला. परंतु तेथे त्याला जुळवून घेता न आल्याने सेठ यांनी त्याला शाळेत पाठवणे बंद केले. या काळात शाळेतर्फे रणवीरला कुठल्याही शालेय वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या. त्यासाठी शाळेने सेठ यांच्याकडून एक हजार रुपये घेतले होते. मुलाचे शाळेत जाणे थांबल्यावर सेठ यांनी शाळा प्रशासनाला पत्र पाठवून त्याबाबत माहिती दिली. तसेच रणवीरच्या सहा दिवसांच्या शाळेचे शुल्क कापून प्रवेश शुल्काची उर्वरित रक्कम परत करण्याची विनंती केली होती.
परंतु शाळा प्रशासनाकडून त्यांना कुठलाही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यानंतरही वारंवार पत्रव्यवहार करून सेठ यांच्या पदरी निराशाच पडली. दोन वर्षे हे सुरूच राहिल्याने कंटाळलेल्या सेठ यांनी अखेर ग्राहक न्यायालयात शाळेविरुद्ध तक्रार केली. न्यायालायनेही शाळेला नोटीस बजावून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. परंतु शाळेकडून या नोटिशीलाही उत्तर देण्यात आले नाही. परिणामी सेठ यांनी केलेल्या आरोपाला शाळेकडून आव्हान देण्यात न आल्याने न्यायालयाने शाळेला चांगली सेवा देण्यात अपयशी ठरल्याप्रकरणी दोषी ठरवले व प्रवेश शुल्काची मूळ रक्कम सहा टक्के व्याजाने देण्यासह मानसिक त्रासाचे अतिरिक्त पाच हजार रुपये देण्याचे आदेश शाळेला दिले.