देशात व राज्यात सत्तेबाहेर फेकल्या गेलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बहुदा आपण विरोधी पक्षात आहोत याचा विसर पडला आहे. यामुळे भाजप सरकारच्या काळात घडणाऱ्या घडामोडींबाबत त्यांच्यामार्फत फारशा प्रतिक्रिया उमटत नाही. यामुळे जनतेशी नाळ तरी कशी जोडली जाणार या अस्वस्थेतुन काँग्रेसच्या महिला आघाडीने महिला कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी पदर खोचला आहे. भाजप सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडून पुढील दिशा ठरविण्यासाठी ७ एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील महिला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ती यांच्या खास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सुस्तावलेल्या कार्यकर्त्यांना सद्यस्थिती मांडून सक्रिय करण्याची वेळ पक्षावर आली आहे.
महिला कार्यकर्त्यांसमोर केंद्र तसेच राज्य सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे तसेच पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी ७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता येथील तुपसाखरे लॉन्स येथे ही कार्यशाळा होणार आहे. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कमल व्यवहारे यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेली काँग्रेस नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सक्रिय होण्यासाठी धडपड करत आहे. महिला आघाडीने आयोजिलेली कार्यशाळा त्याचे निदर्शक. महिला काँग्रेस समितीच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सहा विभागात महिला कार्यकर्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा श्रीगणेशा नाशिक येथुन होत असल्याची माहिती व्यवहारे यांनी दिली. कार्यशाळेत केंद्रात भाजपचे सरकार येऊन नऊ महिन्यांहून अधिक कालावधी लोटला, राज्यातही भाजपचे सरकार येऊन सहा महिन्याचा कालावधी झाला आहे, या काळात भाजपने केंद्रात तसेच राज्यात अर्थसंकल्प सादर केले. त्यात महिला, शेतकरी किंवा अल्पसंख्याकांसाठी कोणत्या नव्या योजना आणल्या, कोणाला काय दिले याचे विश्लेषण, राज्यात ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांवरील वाढते अत्याचार, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, मुळ अन्नसुरक्षा योजनेत केलेले बदल, यामुळे आलेल्या अडचणी यासह अन्य काही प्रश्नांवर महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मुद्दांवर त्यांनी सर्वसामान्य जनतेशी संवाद साधावा अशी अपेक्षा आहे.
कार्यशाळेत भालचंद्र मुणगेकर, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या नियोजनासह आर्थिक जबाबदारी महिला आघाडीने स्वीकारल्याचे व्यवहारे यांनी सांगितले. मार्गदर्शन सत्रानंतर प्रश्नोत्तराचा तास होणार असल्याचे व्यवहारे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रभारी शहराध्यक्ष शरद आहेर, नाशिक महिला आघाडीच्या वत्सला खैरे, जिल्हाध्यक्षा डॉ. ममता पाटील आदी उपस्थित होते.