रक्षाबंधनाच्या निमित्ताने सध्या विविध बाजारपेठांमध्ये राखी आणि विविध भेटवस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. असे असले तरी मागील वर्षी १० ते १५ रुपयांना असणारी राखी यंदा २५ ते ३० रुपयांवर पोहोचली आहे. तर बाजारपेठेत गोंडय़ांच्या राख्यांऐवजी आता मिकी माऊस, रुद्राक्ष, डॉरोमॉन, भीम, मण्यांच्या राख्यांनी त्यांची जागा घेतली आहे. ज्वेलर्समध्येदेखील सोन्यांच्या आणि चांदीच्या मुलामा दिलेल्या राख्या सध्या दिसत आहेत.भाऊ आणि बहीणच्या अतूट नात्यांना रेशीम धाग्यांनी जोडणारा सण म्हणजे रक्षाबंधन. राखीच्या माध्यमातून बहीण आणि भावाचे नाते अधिकच दृढ होत असते. बाजारात या राख्यांच्या खरेदीसाठी महिलावर्गानी एकच गर्दी केली आहे. विविध रंगी त्याचबरोबर ब्रेसलेटसारख्या राख्यांना सध्या बाजारात जोरदार मागणी आहे. मागील वर्षांतील राख्यांची किमती पाहता यंदा साध्या राख्यांनीदेखील आपले मोल वाढवले आहेत. १० ते १५ रुपयांपर्यंत असणाऱ्या राख्या आता २५ ते ३० रुपयांवर पोहोचल्या आहेत.राखी बनवताना धाग्यापेक्षा इतर सजावटीसाठी असणारा खर्च वाढल्याने राखीच्या किमतीत वाढ झाल्याचे राखी विक्रेते सतीश मुलावर यांनी सांगितले. सध्या बाजारात दाखल झालेल्या राख्या या गुजरात आणि सुरत येथून आल्याने देखील त्याचा परिणाम किमतीवर झाला आहे. विशेष म्हणजे गोंडय़ांच्या राख्यांची असणारी परंपरा आता मोडीत निघत फॅन्सी राख्यांनी बाजारात आपले बस्तान मांडले आहे. आकर्षक सजावट ही या राखीची वैशिष्टय़े मानली जातात. दुसरीकडे चांदी आणि सोन्यांच्या दुकानांनीदेखील राख्या विक्री करणे सुरू केले आहे. चांदी आणि सोन्याचा मुलामा दिलेल्या हातातील कडे, ब्रेसलेट सध्या मोठय़ा प्रमाणात विक्रीला जात आहे. इतर राख्यांपेक्षा या राख्यांची किंमत जरी जास्त असली तरी दीर्घकाळ टिकणारी आणि एक आठवण म्हणून हातात कायम राहणारी सोन्या-चांदीची राखी आकर्षक असल्याचे अभिनंदन ज्वेलर्सच्या कामगारांने सांगितले.
भेटवस्तूंकडे ओढा
सध्या बाजारामध्ये बहिणीसाठी काय घ्यायचे, असा प्रश्न भावाला पडत आहे. मात्र असे असले तरी ड्रेस, साडीपेक्षा शोभेच्या वस्तूंना अधिक मागणी मिळत आहे. पेनापासून ते वॉल पीस, घडय़ाळ, बोटातील कासव अंगठय़ा याला अधिक पसंती दिली आहे.