रिलायन्स कम्युनिकेशनमधील व्यवस्थापन विभागात काम करणारे जवळपास अडीचशे कामगार विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहे. त्यामुळे रिलायन्स व त्यावर अवलंबून असणाऱ्या अन्य कंपन्यांची संवाद यंत्रणा ठप्प पडणार असल्याची शक्यता आहे.
रिलायन्स टेलिकॉम कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय परबत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्र-गोवा या क्षेत्रामध्ये व्यवस्थापन विभागात सहायक अभियंता या पदावर शेकडो कामगार गेल्या आठ वर्षांपासून काम करीत आहेत. यातील अडीचशे कामगारांना १ मे २०१३ रोजी रिलायन्स कंपनीने एरिक्शन प्रा. लि. या उपकंपनीत स्थलांतरीत केले. यानंतर मात्र रिलायन्स आणि एरिक्शन या कंपनीचे सूत जमले नाही. यानंतर रिलायन्स कंपनीने १५ जानेवारी २०१५ पासून प्रताप टेक्नोक्रॉप्ट कंपनीत स्थलांतर केले. या कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात खूप कपात केली. तसेच पेट्रोल अलाऊन्स व अन्य सोयी सवलतीही काढून घेतल्या. या अन्यायाच्या विरोधात प्रताप टेक्नोक्रॉप्ट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु यात कुठलाही समाधानकारक तोडगा निघाला नाही.
२ मार्च २०१५ रोजी पुणे येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयात वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी आश्वासने दिलीत. परंतु हे आश्वासन अजूनपर्यंत पूर्ण केले नाहीत. हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी स्मरणपत्रे देण्यात आली. परंतु त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी ३ मे रोजी पंधरा दिवस मुदतीचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. रिलायन्स कंपनीच्या काही टॉवरवर अन्य मोबाईल कंपन्यांची जोडणी आहे. त्यामुळे अन्य कंपन्यांनाही याचा फटका बसणार असून इंटरनेट सुविधा बंद राहणार आहे.