राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांची रेल्वेमध्ये बसण्याच्या कारणावरून महिलेशी वादावादी होण्याचा प्रसंग घडला असून या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या घटनेमुळे सांगलीच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
माजी राज्यमंत्री अजित घोरपडे कोल्हापूरहून मिरजेकडे रविवारी सायंकाळी पॅसेंजर रेल्वेने येत होते. या दरम्यान रेल्वे डब्यात अन्य प्रवासी बसलेले आढळले. मिरजेच्या नदीवेस भागात राहणाऱ्या श्रीमती उषा दीपक कडाळे या सुद्धा आपल्या कुटुंबासोबत मिरजेकडे येत होत्या.  त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा रोहित, दीपक, मुलगी अक्षता आणि सून पूजा या प्रवास करीत होत्या.  श्रीमती कडाळे यांनी महिलांसाठी बाकडय़ावर जागा धरली होती. मात्र अजित घोरपडे यांनी अनारक्षित जागा असल्याने मोकळय़ा जागी बसण्याचा प्रयत्न केला. यावेळी श्रीमती कडाळे यांनी आक्षेप घेत घोरपडे यांना बसण्यास विरोध केला.  यातून उभयतांमध्ये जोरदार वादावादी झाली.  ही वादावादी मिरज स्थानक येईपर्यंत सुरूच होती.
मिरजेत आल्यानंतर श्रीमती कडाळे यांनी घोरपडे यांच्या विरोधात शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल केली.  त्यांनी तक्रार देऊ नये यासाठी स्वत: घोरपडे यांनी त्यांची विनवणी केली. घडल्या प्रकाराबद्दल गरसमज दूर करण्याचे प्रयत्न केले. मात्र महिला तक्रारीवर ठाम होत्या. पोलिसांनीही दोघांच्यात समझोता करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान  घोरपडे यांनीही महिलेच्या दोन मुलांविरुद्ध रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात झाली आहे.  घोरपडे यांच्या बाबतीत सदरचा प्रकार घडल्याने रात्री उशिरापर्यंत रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती.