ठाणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पाच्या मूळ अंदाजपत्रकात सुधारणा करून त्यास सर्वसाधारण सभेमध्ये अंतिम मंजुरी देण्यात आली होती. मात्र, या अंतिम अंदाजपत्रकावर महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांची स्वाक्षरी अद्याप झालेली नसल्याची माहिती स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली आहे. तसेच अंतिम अंदाजपत्रकानुसार कामे करण्याऐवजी प्रशासनाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाच्या आधारे कामे सुरू असल्याची बाब समोर आली आहे. याच मुद्दय़ावरून स्थायी समितीच्या बैठकीत आक्रमक झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरल्याने वातावरण तापले होते. अखेर या संदर्भात सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
ठाणे महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी फेब्रुवारी महिन्यात २ हजार १६६ कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर केले होते. त्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने सुधारणा करून सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवले होते. विशेष अर्थसंकल्पीय सभेत या अर्थसंकल्पामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली होती. तीन ते चार दिवस चाललेल्या या सभेत भांडवली तसेच महसुली खर्चात काही ठिकाणी वाढ करण्याचे सुचविण्यात आले होते. त्यामुळे सुमारे ५०० कोटी रुपयांची वाढ झाली होती. महापालिकेचे अंदाजपत्रक २७०० कोटी रुपयांच्या घरात गेले होते. मात्र, या अंदाजपत्रकानुसार कामे होणे अपेक्षित असताना प्रशासन स्थायी समितीसमोर सादर केल्या अंदाजपत्रकानुसार कामे करीत आहेत, असा आरोप स्थायी समितीमध्ये सदस्यांनी केला. दरम्यान, सर्वसाधारण सभेने मंजुरी दिलेल्या अंदाजपत्रकावर आयुक्त असीम गुप्ता यांची स्वाक्षरी झालेली नसल्याचे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आले. तसेच काही ठिकाणी अंदाजपत्रकानुसारच कामे सुरू असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे सर्वपक्षीय सदस्य आक्रमक झाले आणि त्यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, अंदाजपत्रकाच्या प्रक्रियेसंबंधी सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण यांनी दिल्याने महापालिका प्रशासन अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाले आहे.