प्रस्थापित रिपब्लिकन नेत्यांनी नेहमी केलेल्या वळचणीच्या राजकारणांमुळे रिपब्लिकन पक्षाची स्वतंत्र ओळखच निर्माण होऊ दिली नाही, असा आरोप राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी केला. येथे आयोजित राज्यव्यापी कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते.
रिपब्लिकन पक्ष हा एका जातीपुरता मर्यादित असल्याची ओळख पुसण्याचा सुरूवातीपासूनच जाणीवपूर्वक प्रयत्न राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने केला असल्याचेही कटारे यांनी नमूद केले. देशातील गरीबांच्या हाती जोपर्यंत सत्तेची सूत्रे येत नाहीत तोपर्यंत त्यांची प्रगती होणे अशक्य आहे. त्यामुळे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने समाज जोडो अभियान संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केले आहे.
द्रोहनीती व विश्वासघाताच्या राजकारणामुळे तथाकथीत सत्ताधारी पक्षांनी राष्ट्रीय पातळीवर दलितांचा विश्वास व पाठिंबा गमावला आहे. प्रस्थापित पक्ष कोणताही असो, त्याला साथ देऊन नव्हे तर खतम केल्याशिवाय दलितांना, गोरगरीबांना खऱ्या अर्थाने सत्ता मिळत नाही. उत्तर प्रदेशातील राजकारणातून हा धडा सर्वच राज्यातील दलितांना मिळाला आहे. आंबेडकरी जनतेमध्ये प्रस्थापित पक्षाच्या विरोधी असलेली असंतोषाची जनभावना दडपून रिपब्लिकन राजकारण आता कोणालाही करता येणार नाही, असा इशाराही कटारे यांनी दिला.
या संमेलनात काही ठराव करण्यात आले. त्यात मुंबईतील इंदू मिल जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम त्वरीत सुरू करावे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्यांना त्वरित मदत द्यावी, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे, महागाई कमी करावी, भूमी अधिग्रहण कायदा रद्द करावा. नरेंद्र दाभोलकर व गोविंदराव पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरीत शोधावे, ओझर विमानतळास रिपब्लिकन सेनानी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावे, या ठरावांचा समावेश आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख नारायण गायकवाड हे होते.