राहुरी कृषी विद्यापीठात फूड व बायोटेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाबरोबरच पुणे येथे अ‍ॅग्री बिझनेसचे महाविद्यालय तर, पुण्यातील बटाटा संशोधन केंद्र पुसेगावला, तसेच महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी सांगितले.
कराड येथे शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे, या पाश्र्वभूमीवर डॉ. मोरे पत्रकारांशी बोलत होते.
मोरे म्हणाले, की कराडच्या महाविद्यालयाचे काम एक वर्षांत पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. तेथे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विचार करून इमारत बांधण्यात येत आहे. पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या नूतनीकरणासाठी पाच कोटींचा प्रस्ताव असून,  त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे.
राहुरी कृषी विद्यापीठामध्ये फूड व बायोटेक्नॉलॉजीचे महाविद्यालय नाही. मात्र, त्या अभ्यासक्रमाची खासगी सहा महाविद्यालयं आहेत. त्यांच्या  प्रश्नपत्रिका काढताना येणा-या अडचणी आणि कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांची सोय व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. राहुरी कृषी विद्यापीठात सांगली आणि सोलापूर जिल्हयात कृषी महाविद्यालय विचाराधीन आहेत. कराड व नंदुरबार येथे ५० वर्षांनंतर प्रथमच राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली. दोन्ही महाविद्यालये सुरू आहेत.