संशोधन पूर्ण झालेल्या देशी कापूस बियाण्यांची उपलब्धता केंद्रीय कापूस संशोधन संस्था करेल, अशी ग्वाही संस्थेचे संचालक डॉ. केशव क्रांती यांनी दिली. केंद्रीय कापूस संशोधन संस्था व नागपूर युवा रुरल असोसिएशनमार्फत आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
कापूस उत्पादनाच्या बाबतीत भारत हा जगभरात अग्रेसर आहे. शेतकऱ्यांच्या अर्थकारणात कापूस पिकाचे मोठे योगदान आहे. विशेषत: महाराष्ट्रातील विदर्भ तसेच मराठवाडा, तेलंगना, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू आदी भागात मोठय़ा प्रमाणावर कापसाचे पीक घेतले जाते. विदर्भातील शेतकरी एकेकाळी कापसावर खूष होता, पण अलीकडे कापूस पीक पूर्णपणे बंद केलेले शेतकरी पश्चिम विदर्भात पाहायला मिळतात. हायब्रिड व बीटी वाणाच्या कापसाच्या लागवडीमुळे पारंपरिक, स्थानिक व देशी प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्याचे चित्र आहे. मूळच्या देशी प्रजातीची लागवड करायची म्हटले तरी बियाणे सहज उपलब्ध नाही हे वास्तव आहे. या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना बाहेर काढून मार्ग दाखवण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्था व नागपूर युवा रुरल असोसिएशनमार्फत दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच झाली.
देशी कापूस उत्पादनाची गरज, फायदे, पद्धती, उपलब्ध प्रजाती, उपलब्ध बाजारपेठ व मागणी, देशी कापसाचे बाजारभाव, देशी कापसापासून बनविण्यात येणाऱ्या विविध वस्तू, बियाण्यांची उपलब्धता आदी अनेक विषयांवर शास्त्रोक्त मार्गदर्शन कार्यशाळेत झाले. संशोधन पूर्ण झालेल्या देशी कापूस बियाण्यांची उपलब्धता केंद्रीय कापूस संशोधन संस्था करेल, अशी ग्वाही संचालक डॉ. केशव क्रांती यांनी दिली. मात्र, शेतकऱ्यांनी येत्या खरिपात थोडय़ा प्रमाणात लागवड करून अनुभव घ्यावा व पुढील वर्षांपासून त्याच अनुभवाच्या आधारे मोठय़ा प्रमाणावर लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. क्रांती यांनी यावेळी एकंदरच भारतात कापूस या पिकाची व ते पीक घेणाऱ्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे, याचे चित्रही उपस्थित केले. देशी कापूस उत्पादकाला बाजारभावापेक्षा ५०० ते ७०० रुपये अधिकचा भाव देऊन कापूस खरेदी करण्याचे आश्वासन काही उद्योजकांनी दिले. ही एक सुरुवात आहे आणि येत्या काळात सुसूत्र पद्धतीने देशी कपाशीची लागवड व उत्पादन घेणे अत्यावश्यक आहे. देशी कापूस उत्पादन असा केवळ एक प्रयोग करण्यापेक्षा काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अभ्यासपूर्वक व संघटनात्मक पद्धतीने याची लागवड, उत्पादन व विक्री करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन युवा रुरल असोसिएशनच्या महासंचालकांनी केले.
कर्नाटकमध्ये देशी कपाशीची गेल्या तीन-चार वर्षांत लागवड करणारे सहजा संस्थेचे संचालक कृष्णप्रसाद, देशी कापूस खरेदीदार राठी, देशी कापसापासून वैद्यकीय वापरासाठी बँडेज आदी बनवणारे उद्योजक, गाद्या व तत्सम वस्तू तयार करणारे उद्योजक यावेळी शेतकऱ्यांसोबत उपस्थित होते. तसेच देशी कापूस उत्पादन करू इच्छिणारे, हायब्रिड व बी.टी. कापसाला वैतागलेले शेतकरी विदर्भाच्या सहा जिल्ह्यांतून आले होते. देशी कापसावर सतत संशोधन करणारे अनेक शास्त्रज्ञ यावेळी पूर्णवेळ उपस्थित होते.