संशोधनाने जसा माणूस घडतो, तसा समाज आणि देशही घडत असतो. त्यामुळेच कोणतेही संशोधन केवळ व्यक्तिविकासासाठी नव्हे तर समाजाभिमुख असायला हवे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग हा समाजासाठी व्हायला हवा. संशोधन विद्यापीठांच्या माध्यमातूनही होत असते. विद्यापीठे ही ज्ञानाची केंद्रे आहेत. त्या ठिकाणी माणूस घडवला जातो. त्यामुळे विद्यापीठांचे मूल्यांकन व्हायला हवे. जनतेप्रती विद्यापीठाचे दायित्व आहे, हे विसरता कामा नये, असे मत महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘आविष्कार’च्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.
गर्दीने ओथंबून वाहणाऱ्या वसंतराव देशपांडे सभागृहातील युवावर्गाची उपस्थिती लक्षवेधी आणि उत्साह आणणारी होती. या युवावर्गाला उद्देशून राव म्हणाले, तरुणाईच्या मनात येणाऱ्या कल्पना त्या मनातच जिरायला नकोत तर त्या कल्पनांना संशोधनाच्या माध्यमातून पंख फुटायला हवेत. त्यासाठी मुलांना आर्थिक, मानसिक बळ मिळेल, अशी सवरेतोपरी मदत व्हायला हवी. आपल्या भागात कुपोषण आणि दुष्काळाचे मोठे आव्हान आहे. दुष्काळ आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर समस्या टाळण्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. विद्यापीठांच्यावरही अंकुश असायला हवा. त्यांच्या कामांचे मूल्यांकन व्हायला हवे. जनतेप्रती त्यांचीही काही जबाबदारी आहे, हे विद्यापीठांनी विसरता कामा नये, असा संदेशच त्यांनी विद्यापीठाला दिला. संशोधन केवळ व्यक्तीच्या कामाचेच नव्हे तर समाजाच्या कामाचेही असायला हवे, असेही ते म्हणाले.
यावेळी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) पशू विज्ञानचे उपमहासंचालक डॉ. के.एम.एल. पाठक, मत्स्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए.के. मिश्रा व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. पाठक यांनी आविष्कारमध्ये केवळ विज्ञानच नव्हे तर कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या कलाकृती सादर करण्याची संधी दिली, याबद्दल आयोजनकर्त्यांचे विशेष अभिनंदन केले.
कुलगुरू डॉ. मिश्रा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. एल.बी. सरकाटे, व्ही.व्ही. राणे, डॉ. डी.आर. कलोरे, डॉ. जे.पी. कोरडे आणि इतर उपस्थित होते. संचालन रेणुका देशकर यांनी केले.