तोटय़ात चाललेला बेस्टचा परिवहन विभाग नफ्याच्या मार्गावर आणण्यासाठी बेस्ट प्रशासनाने आपल्या गाडय़ांच्या आरक्षण पद्धतीत बदल करण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव बेस्ट समितीच्या मंजुरीसाठी आला असून त्याला मंजुरी मिळाल्यावर मुंबईकरांना बेस्टच्या गाडय़ा अधिक किफायतशीर दरांत आणि सोप्या पद्धतीने आरक्षित करता येतील. याचा फायदा बेस्ट उपक्रमाला होईलच, पण अनेक खासगी कार्यालये, तसेच मुंबईकरांनाही या सेवेचा लाभ सोप्या पद्धतीने घेता येईल.
बेस्टच्या बसगाडय़ा सध्या पूर्ण दिवस आणि अर्धा दिवस या काळासाठी आरक्षण तत्त्वावर दिल्या जातात. मात्र इतर खासगी वाहतूकदारांच्या तुलनेत बेस्टच्या गाडय़ांचे दर जास्त असल्याचे आढळले होते. विशेष म्हणजे बेस्टने आपल्या कर्मचारी व अधिकारीवर्गाकडून याबाबत सूचना मागवल्या होत्या. कर्मचारी व अधिकारीवर्गाने केलेल्या पाहणीतून हे आरक्षणाचे दर जास्त असून अनेक अटी व शर्ती मुंबईकरांसाठी सोयीच्या नसल्याचे जाणवले.
सध्या बेस्टच्या बसेस फक्त पूर्ण दिवस व अर्धा दिवस (१२) तास एवढय़ाच काळासाठी आरक्षित करता येतात. त्याचप्रमाणे पूर्ण दिवस आरक्षणाचा कालावधी रात्री १२ वाजता आणि अर्धा दिवस आरक्षणाचा कालावधी दुपारी १२ वाजता सुरू होण्याची तरतूद आहे. बस आरक्षित केल्यानंतर आरक्षणाची वेळ व अंतर उपक्रमाच्या बस आगारापासूनच सध्या सुरू होते. या तीन अटी ग्राहकांसाठी तोटय़ाच्या आणि जाचक आहेत. त्यामुळे या आरक्षण सुविधेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता प्रस्तावित सूचनेनुसार फक्त पूर्ण दिवस व अर्धा दिवस यांऐवजी आठ व १६ तास आरक्षणाची सोय होऊ शकते. तसेच कर्मचाऱ्यांनी केलेल्या सूचनांप्रमाणे आता आठ व १६ तासांचा कालावधी प्रत्यक्ष बसगाडीचा वापर सुरू केल्यापासून मोजावा, असे म्हटले आहे. त्यामुळे ग्राहकांना सकाळी आठ वाजता बस हवी असल्यास त्यांना त्या वेळेपासून पुढे आठ किंवा १६ तास बस वापरणे शक्य होणार असून आता आरक्षणाची वेळ व अंतर प्रवाशाच्या आरक्षित ठिकाणापासूनच सुरू होईल. त्यामुळेही प्रवाशांना त्याचा फायदा मिळेल. आरक्षण दर कमी करण्याचाही प्रस्ताव आहे. या प्रस्तावाप्रमाणे पूर्ण दिवसाच्या वातानुकूलित बसचे भाडे १८ हजारांवरून १५ हजार एवढे केले जाईल. तसेच दुमजली बसच्या भाडय़ातही १८ हजारांवरून १५ हजार एवढा बदल होईल. एकमजली व मिडी बसचे पूर्ण दिवसाचे भाडे मात्र १२ हजार रुपये एवढेच राहील. हा प्रस्ताव समितीच्या मंजुरीसाठी पाठवला असून लवकरच त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

विद्यमान दर आणि प्रस्तावित दर खालीलप्रमाणे रुपयांमध्ये
विद्यमान दर
आरक्षण प्रकार          वातानुकूलित           एकमजली          दुमजली         मिडी
पूर्ण दिवस                     १८०००                   १२०००              १८०००        १२०००
अर्धा दिवस                    ९०००                      ६०००               ९०००           ६०००

प्रस्तावित दर
आरक्षण प्रकार            वातानुकूलित    एकमजली       दुमजली      मिडी
पूर्ण दिवस                    १५०००             १२०००              १५०००    १२०००
अर्धा दिवस                   ७५००                ६०००               ७५००       ६०००
आठ तास                      ५०००                 ४०००              ५०००       ४०००
सोळा तास                    १००००                ८०००              १००००     ८०००