नागपूरसह राज्यातील सर्व भागात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडे डोळेझाक होत असून रोज घडणाऱ्या गुन्ह्य़ांचा वाढता आणि तपासाचा उतरता आलेख पाहता सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची शक्य तेवढी मदत घेतली जावी, असा मतप्रवाह सध्या या दलात जोर धरू लागला आहे.
एक वर्ष उलटूनही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी तर दूरच त्यांचा कुठलाही सुगावा अथवा पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांचा तपास थांबला नसला तरी राज्यात शोध न लागलेल्या गुन्ह्य़ांची संख्या मोठी आहे. पोलिसांना अनेकदा लवकर यश येत नाही. मोनिका किरणापुरे हत्या प्रकरणात नागपूर पोलिसांना लवकर यश आलेले नव्हते. पुरेशा मनुष्यबळाअभावी पोलिसांवर सतत ताण असतो. कौटुंबिक जबाबदारीशिवाय बंदोबस्तात ते गुरफटलेले असतात. अशाही परिस्थितीत पोलीस काम करीत असतात.
गुन्ह्य़ांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि तपासाच्या दृष्टीने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शक्य तेवढी मदत घेतली जावी, असे मत सेवानिवृत्त सहपोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले यांनी व्यक्त केले. नव्या अधिकाऱ्याच्या तुलनेत तेथील भौगोलिक, गुन्हेविषयक सखोल माहिती सेवानिवृत्त अधिकाऱ्याला असते. म्हणून सुयोग्य सेवानिवृत्त अधिकाऱ्याची मदत तपासाला पोषकच ठरेल, असे ते म्हणाले.
गुन्हेगारांची मानसिकता, त्यांची गुन्हे करण्याची पद्धती, त्यांचे संबंध याची भरपूर माहिती संबंधित बिट हवालदाराला असते. मोठी योजना आखतानाही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची मदत घेतली जावी. कारण, त्यांना या कामाचा प्रचंड अनुभव असतो. त्यांची सन्मानाने विचारपूस केली तरी ते सहर्ष मदतच करतील. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनीही स्वत:ची जबाबदारी समजून पुढे यायला हवे, असे मत सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक पुरुषोत्तम गवई यांनी व्यक्त केले.
खात्यातील सेवानिवृत्तांकडे पोलीस दलाचे कायमचे दुर्लक्ष होते. अधिकारी कधीकाळी भेटलेच तर त्यांची ख्यालीखुशाली विचारली जाते. मात्र, हे भाग्य फार थोडय़ांच्याच वाटेला येते. विविध कार्यक्रमांना मोजक्याच दोन-चारजणांना आमंत्रणे पाठविली जातात. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांशी नित्य संपर्क संबंधित ठाणेदाराने आदर म्हणून ठेवायला हवा. एखाद-दुसऱ्याचा अपवाद वगळल्यास, अशी माहितीच कुणी ठेवत नाही, असे काही सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी बोलून दाखविले.
केवळ सल्ला घेणेच ठीक
गुन्ह्य़ांच्या तपासात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची मदत योग्य ठरणार नाही. केवळ मौखिक सल्ला घेणे ठीक, पण तपास म्हटला की, तो तटस्थपणेच व्हायला हवा. त्यामुळे बहुतांशी आवश्यक ती गोपनीयता भंग न होणे गरजेचे असते. नोकरीत असलेले विद्यमान अधिकारी व कर्मचारी सुयोग्य तपासासाठी सक्षम असतात, हे लक्षात घेतले पाहिजे.
सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक व
नागपूरचे माजी पोलीस आयुक्त शिवप्रतापसिंह यादव

गुन्हा गंभीर असेल तर मदत घ्यावी
विद्यमान अधिकारी-कर्मचारी सक्षम आहेत. मात्र, प्रत्येक वेळी नाही, तर अपवादात्मक स्थितीतच गंभीर गुन्हा असेल तरच केवळ सुयोग्य सेवानिवृत्त अधिकाऱ्याची मदत जरूर घेतली जावी.
विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम