सेवानिवृत्त कामगारांचे पुनर्वसन तसेच कामगार सुरक्षा योजना सुरू करावी यांसह इतर मागण्यांसाठी बॉश सेवानिवृत्त कल्याण मंडळाचे संस्थापक चेतन पणेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
बॉश कंपनीतील ११०० सेवानिवृत्त कामगारांसह अनेकांना अत्यल्प निवृत्तीवेतन मिळते. महागाई भत्ता मिळत नाही. त्यामुळे काही कामगार आत्महत्याही करीत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर देण्यात येणारी मदत तसेच इतर सवलती कामगार आत्महत्येनंतर त्याच्या कुटूंबियांना देण्यात यावी, ७५०० रूपये निवृत्तीवेतनात वाढ व महागाई भत्ता दरमहा द्यावा, शासन व कारखानदारांनी पाच लाखापर्यंत मेडिक्लेम द्यावा, अशा मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या.
जिल्ह्य़ात अनेक कारखाने बंद पडल्याने हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यांचे पुनर्वसन करून मूलभूत सुविधा व सवलती द्याव्यात, ६० वर्षांवरील कामगारांचा बस व रेल्वे भाडय़ात ५० टक्के सूट द्यावी, सेवानिवृत्त कामगाराच्या कुटूंबास केशरी शिधापत्रिकाधारकाप्रमाणे दरमहा ३५ किलो धान्य द्यावे, शासनाच्या आरोग्य योजनेच्या सर्व सुविधा सेवानिवृत्तीनंतर कामगारांनाही मिळाव्यात, महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या सर्व सवलतींचा लाभ निवृत्त कामगारांना द्यावा आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.