रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा अत्यंत सफाईपणे लंपास करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने काही टोळ्यांमधील गुंडांना पकडल्यानंतर बॅग की सफाई करणाऱ्या टोळ्यांची कार्यपद्धती समोर आली आहे.
उपनगरीय रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन त्यांना लुटणाऱ्या टोळ्या रेल्वेत सक्रिय आहेत. रेल्वे पोलिसांबरोबरच रेल्वे गुन्हे शाखा, तसेच विशेष कृती दल या गुन्ह्य़ांचा तपास करीत असते. रेल्वेत सध्या मोबाइलबरोबरच बॅगा चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना विशेष कृती दलाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल उडानशिव यांनी सांगितले की, बॅगा पळविणाऱ्या टोळ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील वातानुकूलित डब्यातील प्रवाशांच्या बॅगा चोरून त्या प्रसाधनगृहात रिकाम्या करतात आणि त्यातील मौल्यवान
ऐवज काढून तेथच बॅगा टाकून पळून जातात. एकाच वेळी दोन ते तीन जण बॅगची चोरी करीत असतात. अवघ्या काही मिनिटांत ते कुलूपबंद बॅगा तोडतात. आम्ही लक्ष्मीचंद वाधवानी आणि आशीष चौबे ऊर्फ बंटी या दोन बॅग चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बॅग चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.
बॅग चोरांच्या कार्यपद्धतीबाबत बोलताना, गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बॅग चोरांची टोळी फलाटावरील प्रवाशांवर लक्ष ठेवते. गाडी येण्याच्या साधारण अर्धा तास आधी तरी तो फलाटावर आलेला असतो. ही टोळी मग त्याच्या हातात ज्या रंगाची आकाराची बॅग असेल तशीच बॅग लगेच बाजारातून आणतात. मग त्याच्याच डब्यात प्रवेश करून प्रवाशाच्या बॅगेची सफाईदारपणे अदलाबदल करतात. पूर्वी सिनेमात बॅगांची अदलाबदल दाखविली जायची, अगदी तशाच पद्धतीने या बॅगांची चोर अदलाबदल करतात. या बॅग चोरांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांबरोबर रेल्वेची स्थानिक गुन्हे शाखा विशेष कारवाई करीत आहेत.
चालू वर्षांत ५० गुन्ह्य़ांची उकल
उपायुक्त रुपाली खैरमोडे-अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या विशेष कृती दलाने चालू वर्षांत रेल्वेतील चोरीच्या ५० गुन्ह्य़ांची उकल केली आहे. पोलिसांनी एकूण ११ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असून २० आरोपींना अटक केली आहे. जप्त मुद्देमालामध्ये २१ मोबाइलचाही समावेश आहे. अटक आरोपींमध्ये कुख्यात सीमा गुप्ताचाही समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह विशेष कृती दलाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल उडानशीव यांच्याबरोबर बाबा चव्हाण, संदीप गायकवाड, बंडू दळवी, जयेश थोरात, गणेश क्षीरसागर, नाना झोंबाडे, अशोक मराळ, महिला पोलीस मोरे आणि मयेकर यांनी ही कामगिरी केली.