तबला, मृदुंग, ढोलक यासह सर्व प्रकारच्या तालवाद्यांमुळे केवळ भारतातच नाही तर जगात झेप घेणाऱ्या मस्कासाथ बाजारपेठेतील तालवाद्ये घडविणाऱ्या अनेक कारागिरांच्या संसाराची लय बिघडली असून अनेकांचा पारंपरिक व्यवसाय संपुष्टात येतो की अशी भीती निर्माण झाली आहे.गेल्या काही वर्षांत तालवाद्य शिकणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी त्यांची निर्मिती मात्र शहरात पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. मस्कासाथ परिसरात तालवाद्ये तयार करणाऱ्यांची पूर्वी मोठी वस्ती होती. मात्र, महापालिकेने अवैध बांधकाम म्हणून त्यांची घरे पाडल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मध्य नागपुरातील या बाजारपेठेत गेल्या कित्येक वर्षांपासून तालवाद्ये तयार करणाऱ्या बसोर जमातीच्या पिढीजात व्यवसायावर महापालिकेने यापूर्वी अतिक्रमण कारवाई करून त्यांच्यावर गदा आणली होती. त्यातून ते सावरत असताना त्यांना त्या भागातील घरे खाली करण्यास सांगितले आहे. या कारागिरांना आर्थिक साह्य़ करून मदतीचा हात देण्यासाठी शासन उदासीन असून आता त्यांची चाळ अतिक्रमणाच्या नावाखाली हटविली जात आहे. पूर्वी मोठय़ा प्रमाणात तालवाद्ये तयार करणाऱ्यांनी नागपुरात बस्तान मांडले असताना आज बोटावर मोजण्याइतके कारागीर असून त्यांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे.
आदिवासी बसोर जमात असलेल्या तालवाद्य कारागिरांच्या चाळीने विदर्भाचे नाही तर साऱ्या भारताचे नादमय विश्व घडविण्यात मोलाचा हातभार लावला आहे. विशेष म्हणजे तालसुराचे प्राथमिक ज्ञान नसताना अनेक लोक अतिशय सफाईने तालवाद्ये तयार करीत असतात. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने दिवसरात्र मेहनत करून तयार केलेल्या या तालवाद्यांना रास्त भाव मिळत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. तबला, पखवाज, ढोलक तयार करणे मेहनतीचे काम असले तरी त्याप्रमाणे पैसा मिळत नाही.
बसोर ही आदिवासी जमात पण शासनाच्या अनास्थेमुळे सवलती मिळत नाहीत. अनेकांचा पारंपरिक व्यवसाय असला तरी नवीन पिढी याकडे वळत नाही. तबला, ढोलक, पखवाज अशी चर्मवाद्ये तयार करणाऱ्या या उद्योगाला शासनाने लघुउद्योगाचा दर्जा देऊन कर्ज देण्यात यावे, अशी येथील कारागिरांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र, त्यांना कर्ज दिले जात नाही. पूर्वी ४० ते ५० तालवाद्ये तयार करणाऱ्यांची घरे असताना आज मात्र बोटावर मोजण्याइतकी त्यांची घरे शिल्लक आहेत. दोन लहान खोल्यांमध्ये व्यवसाय करून ते संस्काराचा गाडा सांभाळतात. नवीन तालवाद्यांची निर्मिती करण्यासोबत वाद्य दुरुस्तीची कामे या ठिकाणी केली जातात. शहरात वेगवेगळ्या वाद्यांची दुकाने थाटली असली तरी त्यांची निर्मिती करणारे मात्र फारसे दिसून येत नाहीत. मुंबई-पुणे तबला निर्मितीचे केंद्र असले तरी देशातील अनेक कलावंत नागपुरात आले की या ठिकाणी तालवाद्यांची खरेदी करीत असतात. एरवी सुरात वाद्य लावणाऱ्या कारागिरांची संसाराची लय बिघडत असताना सूर बेसूर होतो की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे.