वाहतूक पोलिसांना फक्त परवाने जप्त करण्यात स्वारस्य
कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाण्याच्या मार्गावर केवळ आणि केवळ रिक्षाचालकांचे साम्राज्य आहे. वाहतूक पोलिसांसमक्ष आणि शहर पोलिसांच्या चौकीच्या साक्षीने रिक्षाचालकांची चाललेली दादागिरी ही तेथे नेमके कोणाचे राज्य आहे हे दाखवते. रेल्वे स्थानकाच्या पुलाच्या पायऱ्यावंर उभे राहून सामान घेतलेल्या प्रवाशांच्या हातातून सामानासहित त्यांना रिक्षात कोंबून नेणाऱ्या चालकांच्या विरोधात कारवाई करण्याची ताकद ना वाहतूक पोलिसांमध्ये आहे ना रिक्षाचालकांच्या संघटना चालविणाऱ्या स्थानिक नेत्यांमध्ये!
डॉ. हकीम समितीने केलेल्या शिफारशींनुसार आवश्यक असलेले ओळखपत्र एकाही रिक्षाचालकाकडे नाही आणि असे काही असते हे वाहतूक पोलिसांनाही ठाऊक नाही. सकाळपासून केवळ काही रिक्षाचालकांचे परवाने जप्त करण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई वाहतूक पोलीस करीत नसल्यामुळे रिक्षाचालकांची दंडेली दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
कुर्ला स्थानक ते टर्मिनसकडे जाण्याच्या मार्गावर चालणाऱ्या रिक्षा नेमक्या कोणत्या संघटनेच्या आहेत, हे कळण्यास मार्ग नाही. कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या अधिकृत स्टॅण्डजवळच रिक्षांच्या आणखी रांगा लागलेल्या असतात आणि एखाद्या दुकानाजवळ वाहतूक पोलीस उभे असतात. रिक्षाचालकांच्या दंडेलीची तक्रार त्यांच्याकडे केल्यास ते कारवाई म्हणून त्या रिक्षाचालकास बाजूला घेतात आणि तक्रारदारास दुसऱ्या रिक्षाने जाण्याचा सल्ला देतात. कुल्र्याच्या तिकीट खिडक्यांजवळ टर्मिनसकडे जाणाऱ्या रिक्षांची रांग लावण्यात आलेली असते. या ठिकाणी हातात बॅग असलेल्या किंवा कुटुंब कबिल्यासह सामान घेऊन येणाऱ्या प्रवाशाला अक्षरश: पकडून रिक्षात कोंबण्यात येते. एका वेळी रिक्षामध्ये किमान आठ प्रवासी घेण्यात येतात. प्रत्येक प्रवाशाकडून १५ ते २० रुपये आकारण्यात येतात. वाटेत असलेल्या रेल्वे फाटकाची दहशत दाखवून प्रवाशांना पळविण्यात येते. प्रवाशांनी रिक्षा भरली की ती फाटकाजवळ नेऊन उभी करायची. प्रवाशांनी घाई करण्याचा प्रयत्न केला तर त्याला दमदाटी करून बसवून ठेवायचे, हा या रिक्षाचालकांचा उद्योग असतो. फाटकाजवळ चालणाऱ्या दंडेलीची कुणीही दखल घेत नाही. या रिक्षाचालकांनी काही वर्षांंपूर्वी कुर्ला स्थानक ते टर्मिनस अशी चालणारी बेस्टची मिनी बससेवाही बंद पाडली होती. मात्र त्याचे सोयरसुतक ना बेस्टला होते ना स्थानिक लोकप्रतिनिधींना!
एप्रिल २०१२ मध्ये रिक्षाच्या भाडय़ांमध्ये एक रुपयाची वाढ झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी अधिकृत भाडेवाढीचा फलक प्रवाशांच्या सोयीसाठी लावला होता. मात्र अवघ्या काही दिवसांमध्ये तो फलक काढून टाकण्यात आला.
आम्हाला परवाना जप्त करण्याव्यतिरिक्त कारवाईचे अधिकार नाहीत, असे तेथे उभ्या असणाऱ्या वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. येथे सुमननगर वाहतूक पोलीस चौकीचे नियंत्रण असते. अलिकडेच रिक्षा-टॅक्सी चालकांना ओळखपत्र प्रवाशांना दिसेल असे वाहनात लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचे पत्रक वाहतूक पोलिसांनाही देण्यात आल्याचे पूर्व उपनगर प्रादेशिक परिवहन विभागाचे म्हणणे आहे. मात्र सुमननगर पोलीस चौकीमधील पोलिसांना त्याची खबरबातच नाही. असे काही आदेश निघाल्याचे आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेले नाही, असे एका वाहतूक पोलिसाने सांगितले. दिवसात काही ठराविक संख्येने रिक्षाचालकांचे परवाने जप्त करायचे या व्यतिरिक्त कोणतीही कारवाई करण्यास त्यांची तयारी नसते.
रिक्षाचालकांच्या दंडेलीच्या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला स्थानकाजवळच्या पोलीस चौकीत नेण्यात येते. तेथे पोलीस आणि वाहतूक पोलीस संबंधितास तक्रार मागे घेणे किती योग्य आहे, हे समजावून सांगून त्याची बोळवण करतात. कारण तोपर्यंत संबंधित रिक्षाचालकाचे साथीदार त्या चौकीच्या आवारात गोळा झालेले असतात. अलिकडेच परिवहन विभागाने प्रिंटर नसलेल्या टॅक्सींच्या विरोधात कारवाई केली तेव्हा ही कारवाई चुकीची असल्याचे सांगत रिक्षा आणि टॅक्सीचालक जमा झाले होते. रिक्षाचालकांच्या अशा झुंडशाहीमुळे अनेकदा प्रवाशांचे किमती सामान गहाळ (चोरीला?) गेले आहे. परिणामी वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या दंडेलीला कोणी रोखायचे हा प्रश्न आहे.
सकाळी आणि सायंकाळी वाहतूक विभागाचे पोलीस कुर्ला स्थानकाजवळच्या एका दुकानामध्ये उभे असतात. तेथे काही ठराविक रिक्षाचालकांना बोलावून त्यांच्याकडून परवाने घ्यायचे आणि त्यांना पावत्या द्यायच्या इतकेच का त्यांच्याकडून होत असते. येथे असणारे वाहतूक पोलीस हे स्थानक असल्याने त्यांचा रिक्षाचालकांशी परिचय असतो. त्यामुळे क्वचितच रिक्षाचालकांवर कारवाई होत असते. दर दिवशी सकाळीच ठराविक रक्कम त्यांच्याकडे दिली की दिवसभर टेन्शन नसते. मग कितीही प्रवासी घ्या किंवा भाडे नाकारून तेथेच उभे राहा अथवा रेल्वे स्थानकात शिरून प्रवाशांना आपल्या रिक्षात कोंबा कोणीही काहीही करत नाही, असे रिक्षाचालकांच्या स्थानिक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. येथे मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे काही चालणार नाही, असे स्पष्टपणे त्या पदाधिकाऱ्याने सांगितले.