जन्मापासूनच कुपोषित आणि दुर्लक्षित असलेल्या एखाद्या मुलाकडे अचानक लोकांचे लक्ष जावे आणि त्याला सुदृढ करण्यासाठी प्रयत्न सुरू व्हावेत, असेच काहीसे सध्या मोनोरेलबद्दल होत आहे. मोनोरेल सुरू झाल्यानंतर ‘नव्याची नवलाई’ संपल्यापासून तिच्या प्रवासी संख्येत कमालीची घट झाली होती. इतर वाहतुकीच्या साधनांशी अजिबात जोडलेली नसल्याने प्रवाशांना मोनोरेलमधून उतरल्यानंतर इच्छित स्थळ गाठणे कठीण जात होते. मात्र आता मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने यावर तोडगा काढत मोनोरेल स्थानकांजवळ रिक्षा आणि टॅक्सी यांच्या १४ थांब्यांना मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे एका मार्गाचे ११ रुपये खर्च करून मोनोरेलमध्ये बसलेल्या प्रवाशांना बाहेर पडल्यानंतर रिक्षा-टॅक्सी यांसाठी किमान २५ रुपयांची फोडणी बसणार आहे.
चेंबूर स्थानक ते वडाळा डेपो या स्थानकांदरम्यान फेब्रुवारी २०१४मध्ये मोनोरेलचा पहिला टप्पा कार्यान्वित झाला. मात्र मोनोरेलच्या या मार्गावरील एकाही स्थानकाजवळ रिक्षा किंवा टॅक्सी थांबा देण्यात आला नव्हता. वडाळा डेपो येथे उतरल्यानंतर तर इतर वाहतुकीचे साधन मिळण्यासाठी किमान एक ते दीड किलोमीटर चालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळे मोनोरेलमधून प्रवास करण्याची ‘नव्याची नवलाई’ ओसरल्यानंतर प्रवाशांनी मोनोरेलकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे पहिल्या आठवडय़ात दीड ते दोन लाखांपर्यंत गेलेली मोनोरेलची प्रवासी संख्या कमी होत होत आता १५ हजारांवर आली आहे. त्यातच मेट्रोवन प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून तर मोनोचे हे अपयश ठळकपणे समोर येत होते.
मात्र आता मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने चेंबूर स्थानक ते म्हैसूर कॉलनी या मोनोरेलच्या स्थानकांजवळ किमान एक ते दोन रिक्षा थांब्यांना परवानगी दिली आहे. हे थांबे चेंबूर आणि ट्रॉम्बे या भागात प्रामुख्याने आहेत. तसेच याबाबतची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी आणि लोकांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचनाही प्राधिकरणाने दिल्या आहेत.
हे थांबे कुठे असावेत, याबाबत प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, बेस्ट, वाहतूक पोलीस आणि मोनोरेल प्रशासन यांनी एकत्रितपणे सर्वेक्षण केले आहे. हे थांबे मोनो स्थानकाच्या शक्य तेवढय़ा जवळ असतील, याचीही काळजी घेण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. त्याचा फायदा प्रवाशांना होणार असून भविष्यात मोनोरेलच्या प्रवासी संख्येतही वाढ होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.