महिलांसाठी स्वतंत्र रांगा उपलब्ध करून देऊन फार मोठी सुविधा दिल्याची बतावणी कल्याणमधील रिक्षा संघटना करीत असल्या तरी प्रवाशांचा जाच कायम आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील रिक्षांसाठी मीटर सक्तीचे असले, तरी या दोन्ही शहरांत रिक्षातील मीटर केवळ शोभेपुरतेच आहेत. त्यामुळे रिक्षाचालक सांगेल ते पैसे मोजा अथवा उपलब्ध असेल तर रिक्षा शेअर करा असे दोनच पर्याय प्रवाशांपुढे आहेत. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांची मनमानी आणि बेशिस्त पार्किंगच्या कोंडाळ्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यात वाहतूक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने कल्याणकर प्रवाशांना कुणीच वाली उरलेला नाही. त्यामुळे रिक्षाचालकांच्या आरेरावीविरुद्ध प्रवाशांमध्ये प्रचंड चीड आहे.
 भाडे नाकारणारे मुजोर रिक्षाचालक, मीटरऐवजी थेट भाडे मागण्याची पद्धत आणि बेशिस्त पार्किंग यामुळे कल्याण स्थानक परिसराला रिक्षांच्या कोंडाळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरामध्ये वीस हजाराहून अधिक रिक्षा असून ३६ हून अधिक अधिकृत रिक्षा स्थानके आहे. मात्र यापैकी एकाही ठिकाणी मीटरप्रमाणे रिक्षा भाडे घेऊन प्रवाशांना प्रवास करू देण्यास रिक्षाचालक तयार होत नाही. विशेष म्हणजे प्रवाशांना कायद्याप्रमाणे ही सुविधा प्राप्त करून घेण्याचा अधिकार असतानाही उपप्रादेशिक वाहतूक विभाग आणि वाहतूक पोलीस मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने प्रवासी त्रस्त आहेत. शहरामध्ये प्रत्येक स्थानकामध्ये शेअरप्रमाणे रिक्षा उपलब्ध होत असल्या तरी अनेक वेळा गर्दीच्या प्रसंगी थांब्यांवर रिक्षाच उपलब्ध नसतात. याचवेळी हे रिक्षाचालक अनधिकृतपणे रस्त्यामध्ये रिक्षा थांबवून प्रवाशांकडून थेट भाडे मागण्याकडे लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर रिक्षांची कोंडी निर्माण होत आहे. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या रिक्षांचे कोंडाळे वाहतूक कोंडी निर्माण करून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप देते.          
रिक्षाचालक-मालक संघटनांचे अपयश..
उपप्रादेशिक वाहतूक विभागाच्या मदतीने गेल्या दोन वर्षांपासून मीटरप्रमाणे रिक्षा चालवण्याच्या उपक्रमासाठी रिक्षाचालक-मालक संघटना सहकार्य करत असल्याचे भासवीत असल्या, तरी प्रत्यक्षात परिस्थिती विपरीत आहे. मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणाऱ्या चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारल्यास संघटना त्यास विरोध करतात. त्यामुळेच अद्याप कल्याण-डोंबिवलीत मीटरप्रमाणे रिक्षा चालत नाहीत.
मीटर रिक्षांच्या रांगेसाठी जागा नाही..!
कल्याण स्थानकासमोर रिक्षांच्या दोन रांगा उभ्या होतील एवढी जागा रेल्वेकडून उपलब्ध करून देण्यात आली असून, या दोन्ही रांगामधून शेअर रिक्षा सुटतात. त्यामुळे या भागामध्ये आणखी एक मीटरप्रमाणे रिक्षांच्या स्वतंत्र रांगेसाठी जागा उपलब्ध नाही. रेल्वेकडे रिक्षांसाठी आणखी जागेची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली. मीटरप्रमाणे येण्यास रिक्षाचालकाने नकार दिल्यास उपप्रादेशिक वाहतूक विभागाकडे प्रवासी तक्रार करू शकतात. भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना एक हजार रुपयांचा दंड करण्याची तरतूद आहे. १ एप्रिलपासून अशा कारवाईतून सुमारे दोन लाखाहून अधिक दंड जमा करण्यात आला असून, प्रवाशांनी तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही. आर. गुजराथी यांनी केले आहे. तक्रारीसाठी क्रमांक- ०२५१/२२३०८८८.