देशात संशोधन संस्कृती रुजवण्याची तसेच त्यास प्रोत्साहन देण्याची गरज माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी मंगळवारी नागपुरात व्यक्त केली.
‘विज्ञान भारती’तर्फे ‘विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे देशाची वाटचाल’ विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी, डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र जोशी व संस्थेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. देशात संशोधन प्रवृत्ती वाढीस लागायला हवी. मुळात संशोधन संस्कृती रुजायला हवी. ही वृत्ती वाढीस लागावी आणि त्यास उद्योगक्षेत्राने पाठबळ द्यायला हवे, असे डॉ. कलाम म्हणाले.
‘इस्रो’मध्ये असताना ते एसएलव्ही प्रकल्पाचे कलाम संचालक होते. एक उपग्रह पाठवायचा होता, मात्र तो अयशस्वी ठरला. तेव्हा त्या केंद्राचे प्रमुख सतीश धवन यांनी स्वत: पुढे होऊन ती जबाबदारी स्वीकारली. त्यांनी पुन्हा काम करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर हा प्रकल्प यशस्वी झाला. तेव्हा मात्र त्यांनी मला पुढे केले. ही घटना सांगून कलाम म्हणाले, अपयशाची जबाबदारी स्वत:वर घेणारा आणि यशाचे श्रेय सहकाऱ्यांना देणारा असा प्रमुख असायला हवा. जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात असा, लक्ष्य मात्र मोठेच असले पाहिजे. लक्ष्य लहान असेल तर प्रयत्न कमी होतील. मात्र, लक्ष्य मोठे असेल तर प्रयत्नही जास्त होतील, याकडे त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.
शहरी व ग्रामीण क्षेत्रातील दरी वाढली असून ती कमी करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून कलाम म्हणाले, एकूणच सवार्ंगीण विकासासाठी व्हिजन २०२० राबविण्यात आले होते. शिक्षण मूल्याधारित असावे. कृषी क्षेत्रातही विकास व्हावा, सर्वाना शिक्षण मिळावे, शिक्षणक्षेत्रात दहशतवाद नसावा, गरिबी संपावी, असा उद्देश त्यामागे होता. देश एकसंघ असावा. त्यासाठीच तुमचे प्रयत्न, प्रत्येक क्षण खर्च व्हावा. दुसऱ्याच्या सफलतेचा आनंद तुम्हाला स्वीकारता यायला हवा, असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्ने विचारली. त्यावर त्यांनी समर्पक उत्तरे दिली. देशाचे संरक्षण क्षेत्र केवळ परकीय देशांवर अवलंबून नाही. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे तयार केली जात आहेत. ब्रह्मोस क्षेपणास्त्र मूळ रशियाच्या तंत्रज्ञानावर असले तरी त्यात बदल करून स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित तयार करण्यात आले आहे. ते विकसित करून आता दुसऱ्या देशाला विकले जाणार असल्याचे कलाम यांनी सांगितले. देशाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रापेक्षा शिक्षण क्षेत्रासाठी कमी तरतूद असायची. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ती वाढत असून एकूण सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) दोन टक्के तरी ती असते, असे ते म्हणाले. डॉ. कलाम यांनी प्रारंभी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक मा.स. गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर ‘प्यारे मित्रो नमस्कार’ अशी हिंदीत सुरुवात करून विद्यार्थ्यांची मने जिंकली.