खड्डेमय रस्ते आणि सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या मुंब्रा बाह्य़वळण रस्त्यावरील टोलनाका रविवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला असून या नाक्यावरील वसुली बंद करण्यात आली आहे. या रस्त्यावरील खड्डय़ांचा निषेध म्हणून शिवसेनेने दोनच दिवसांपूर्वी या मार्गावर मोठे आंदोलन केले होते. तसेच टोलनाक्याची तोडफोडही करण्यात आली होती. त्यामुळे रविवारपासून वसुली बंद होताच स्थानिक शिवसेना नेत्यांना स्फुरण चढले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी ऐन आचारसंहितेच्या काळात बॅनरबाजी सुरू झाली आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या मार्गावर टोलनाक्यांचा अक्षरश:  विळखा पडला असून यामुळे वाहन चालकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी आहे. ठाण्यातून मुंबईकडे तसेच नवी मुंबईकडे जाण्यासाठी अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतराने टोलनाके उभारण्यात आले आहेत. घोडबंदर मार्गावरही टोलनाका उभारण्यात आला असून मुंबई-नाशिक तसेच ठाणे-भिवंडी रस्त्यावरही टोलनाका आहे. टोलनाक्यांच्या उभारणीनंतरही रस्ते मात्र फारसे सुस्थितीत नाहीत. मुंब्य्रातील वाहतूक कोंडी टळावी यासाठी मुंबई-पुणे महामार्गावर उभारण्यात आलेला मुंब्रा-बाह्य़वळण रस्त्याची रडकथा अगदी सुरुवातीपासून सुरू आहे. अटलांटा कंपनीमार्फत उभारण्यात आलेला हा रस्ता मध्यंतरी खचल्यामुळे ठाणे-बेलापूर महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झालेली पाहायला मिळाली.
या बाह्य़वळण रस्त्यांची बांधणी सदोष असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्या तरी एकही राजकीय नेता त्या विरोधात आक्रमक होताना दिसत नसे. बाह्य़वळण रस्त्यावरून अवजड वाहने कलंडून टेकडीवर उभारण्यात आलेल्या घरांवर कोसळल्याचे प्रकारही घडले होते. हा रस्ता बांधण्याचे काम अटलांटा कंपनीला सप्टेंबर २००० मध्ये देण्यात आले होते. रस्ता बांधणी तसेच टोल वसुलीसाठी कंपनीसोबत १४ वर्षांचा करार करण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून बाह्य़वळण रस्त्यावर मोठाले खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांमधून नाराजीचे सूर उमटत होते. अवजड वाहनांची मोठी गर्दी या रस्त्यावर होत असल्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकार सातत्याने घडत होते.
बाह्य़वळण रस्त्यावर होणाऱ्या कोंडीमुळे शीळ-महापे रस्त्यावरही अवजड वाहनांच्या रांगा लागत असत. त्यामुळे या मार्गावरील टोल नाका बंद व्हावा या मागणीसाठी शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी मोठे आंदोलन केले होते. तसेच टोलनाक्याची तोडफोडही करण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर अटलांटा कंपनीसोबत करण्यात आलेला करार संपल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रविवारपासून या रस्त्याचा ताबा घेत टोलनाका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापुढील काळात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत टोलनाक्याची देखभाल तसेच दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती या विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वृत्तान्तला दिली. दरम्यान, टोलनाका बंद होताच या परिसरात श्रेयाचे राजकारण रंगले असून आव्हाडांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेने कळवा तसेच मुंब्रा परिसरात जागोजागी मोठे बॅनर लावले आहेत. आचारसंहितेच्या काळात रंगलेल्या या बॅनरबाजीमुळे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.