गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डय़ांची डागडुजी करण्याचे काम सुरू केल्याने तात्पुरत्या स्वरूपात का होईना नाशिककरांना हायसे वाटत आहे.
भूमिगत गटारींच्या कामासाटी शहरात अनेक ठिकाणी रस्ते उखडण्यात आले आहेत. त्यापैकी काही रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली असली तरी गंगापूर रस्त्याचा काही भाग अजूनही दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे या रस्त्यावर पावसामुळे परिसरातील मातीचे थर बसत असल्याने या रस्त्याला एखाद्या ग्रामीण भागातील रस्त्याचे स्वरूप आले आहे.
कित्येक दिवसांपासून सुरू असलेले रेडक्रॉस सिग्नल ते मेनरोड यादरम्यान काँक्रिटीकरणाचे काम अलीकडेच गणेशोत्सवामुळे घाईघाईत पूर्ण करण्यात आले. त्यामुळे मेनरोडच्या चौफुलीवरच खड्डे पडले आहेत.
हे खड्डे आता विसर्जनापर्यंत बुजविण्यात येण्याची शक्यता आहे. याशिवाय त्रिमूर्ती चौक ते पवननगर या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे.
कामामुळे या रस्त्याच्या एकाच बाजूचा वापर करण्यात येत असून संपूर्ण रस्ता चिखल आणि खड्डेमय झाला असल्याने वाहनधारक आणि पादचाऱ्यांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. इतक्या अडचणींना तोंड द्यावे लागत असूनही सिडकोवासीय सहनशील आहेत.
पंचवटीतील अनेक रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले असून हे खड्डे बुजविण्याचा काही प्रमाणात प्रयत्न सुरू असला तरी त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या निकृष्ठ साहित्यामुळे खड्डे बुजण्याऐवजी पाऊस पडल्यानंतर चिखल अधिक प्रमाणात होत आहे.