डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा भागातील गोपीनाथ चौक ते खाडीकिनारी जाणारा तीस फुटांचा विकास आराखडय़ातील रस्ता पालिकेकडून बांधण्यात येत नसल्याने या भागातील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्यावरून कलावती आई मंदिर, देवीचा पाडा भागातील रहिवासी ये-जा करतात. वाहनांची या रस्त्यावर वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यात चिखल झाला आहे. या रस्त्यावरून जाताना शालेय विद्यार्थी, पालकांची सर्वाधिक तारांबळ उडत आहे.
कल्याणमधील बेतूरकरपाडा येथे विकास आराखडय़ातील रस्त्यामध्ये एका विकासकाने इमारत बांधली आहे. या विभागाचे नगरसेवक अरविंद पोटे यांनी पालिकेच्या अतिक्रमण विभाग, नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना मागील दीड वर्ष तक्रारी करूनही या इमारतीवर कोणतीही कारवाई केली जात नाही. अधिकारी दाद देत नाहीत म्हणून नगरसेवक अरविंद पोटे यांनी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ही माहिती मागवली आहे. गेल्या दीड वर्षांत नगररचना विभागाने पोटे यांच्या प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. याविषयी पोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकास रखडवण्यात अधिकारीच महत्त्वाची भूमिका बजावतात, अशी टीका पोटे यांनी केली आहे.