सुट्टीनिमित्ताने गावी गेलेल्या चाकरमान्यांच्या घरांना चोरटय़ांकडून टारगेट केले जाते. घरात काहीच हाती न लागल्यास घरातील साहित्याची चोरटय़ांकडून नासधूस करण्यात येत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच काहीसा अनुभव नेरुळ येथील अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूलच्या मालकांना आला. नेरुळ परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा बसावा, यासाठी जनजागृतीपर पत्रकांचे परिसरात वाटप केल्याने त्यांच्या कार्यालयाला चोरटय़ांनी लक्ष्य केले आहे. बुधवारी रात्री स्कूलचे शटर उचकटण्यात अपयशी ठरलेल्या चोरटय़ांनी स्कूलसमोर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून कारची नासधूस केली आहे. इतकेच नव्हे तर कार्यालयाबाहेर असलेल्या कुंडय़ादेखील चोरटय़ांनी फोडल्या आहेत. या प्रकरणावरून नेरुळ परिसरात चोरटय़ांच्या सुरू असलेल्या थैमानाचा प्रत्यय नेरुळकरांना आला आहे.
शहरामध्ये वाढत्या चोरीच्या घटनांनी सर्वसामान्य नवी मुंबईकर धास्तावला आहे. घराला कुलूप लावून बाहेर पडलेल्या नवी मुंबईकराला घरात चोरी तर होणार नाही या विचाराने ग्रासलेले असते. यामुळे अनेकदा घराबाहेर न पडणेच पंसत केले जाते किंवा चोरी होऊ नये म्हणून देवाला साकडे घालण्याची वेळ त्यांच्यावर येते. नेरुळ परिसरात चेन स्नॅचिंग, घरफोडी आदी परिसरात नित्याच्या झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नेरुळ पोलिसांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरटय़ांच्या मुसक्या आवळल्याने काही प्रमाणात या गुन्ह्य़ांचे प्रमाण कमी झाले आहे. घरफोडी आणि इतर गुन्ह्य़ांना लोक जनजागृतीच्या माध्यमातून आळा बसावा या हेतूने अंकिता ट्रेनिंग स्कूलचे मालक दिलीप आमले यांनी काही दिवसांपूर्वी नेरुळ परिसरात खबरदारीच्या उपायोजनांबाबत सूचनांचे माहितीपत्रकांचे वाटप केले होते.
ही बाब चोरटय़ांना कदाचित रुचली नसल्याने चोरटय़ांनी त्यांच्या ट्रेनिंग स्कूलच्या कार्यालयालाचा लक्ष्य केले असल्याचे समोर आले आहे. सेक्टर ६ येथील निलगिरी अपार्टमेंटमध्ये त्यांचे कार्यालय आहे. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे कार्यालय बंद करून ते घरी गेले होते. सकाळी कार्यालय उघडण्यासाठी आले असताना कार्यालयासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या कारच्या काचा फोडल्याचे आणि लॉक उचकटल्याचे लक्षात आले. तसेच कार्यालयाचे शटर चोरटय़ांनी उचकटल्याचे आणि तेथे असलेल्या रोपांच्या कुंडय़ा फोडल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले.
कार्यालयाचे शटर उचकटण्यास चोरटय़ांना यश न आल्याने रागाच्या भरात त्यांनी कारची नासधूस केली असवी असे त्यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी मद्याच्या काही बॉटल सापडल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली आहे.