मागील वर्षांचा कित्ता गिरवत नववर्षांच्या सुरुवातीला चोरटय़ांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. घरफोडी व लूटमारीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे तीन लाखाच्या आसपास रोकड, सोन्याचे दागिने व भ्रमणध्वनी लंपास करण्यात आले. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
कॅनडा कॉर्नरवरील द फ्रंट पेज हॉटेलमधून संशयितांनी दुपारच्या सुमारास ७० हजार रुपये लुटून नेले. बळवंत राऊत हे सुरक्षारक्षक म्हणून येथे काम करत होते. दुपारी हॉटेल काही वेळासाठी बंद ठेवण्यात आले होते. यावेळी दोन संशयितांनी हॉटेलसह अन्य काही चौकशी करताना त्यांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला. संधी साधत संशयितांनी राऊत यांना दोरीने बांधून मारहाण केली. हॉटेलचे शटर उचकावत आत प्रवेश केला. गल्ल्यांत असलेले ७० हजार रुपये बळजबरीने लुटून नेले. या प्रकरणी विशाल निकम यांनी सरकारवाडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुसरी घटना उपनगर येथील र्मचट बँकेत घडली. तुमचे पैसे खाली पडले आहे असे सांगून संशयितांनी ९२ हजार रुपये किमतीची रोख रक्कम घेऊन पलायन केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगर परिसरातील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी ९७ हजार रुपयांची रोख रक्कम व दागिने लंपास केले. दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटीतील मुद्देमाल त्यांनी लंपास केला. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने व अंगठय़ा, लॅपटॉप असा ७८ हजार रुपयांना माल लंपास करण्यात आला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर रस्त्यावरील सावरकरनगर येथे लूटमारीची घटना नुकतीच घडलेली असताना काहिसा तसाच प्रकार दुसऱ्या दिवशी द्वारका येथे घडला. गणराज कॉम्प्लेक्स येथे राहणारा विशाल गरेवाल रात्री उशिरा काही कामानिमित्त बाहेर पडला होता. मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला उभी करत असताना संशयित आझाद निसार शेख, मुश्ताक मेहमूद शहा आणि गुलशन त्याच्याजवळ आले. इथे काय करतो असे विचारत त्यास दमबाजी केली. यावेळी त्याच्या खिशातील ११ हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी बळजबरीने काढून घेतला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. एक संशयित अद्याप फरार आहे.