दक्षिण मुंबईत दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेला यश आले आहे. या टोळीने जेजे मार्ग आणि नागपाडा येथील दुकाने लुटल्याची कबुली दिली आहे. ही सराईत टोळी असून या टोळीकडून मुंबई आणि परिसरात अन्य घरफोडीचे गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जे.जे. मार्ग येथे बुखारी मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स तसेच नागपाडा येथील चामडय़ाच्या पर्सचे एक दुकान ऑगस्ट महिन्यात लुटण्यात आले होते. दोन्ही दुकाने रात्रीच्या वेळी तोडून त्यातील एक लाखांहून अधिक रोकड लुटण्यात आली होती.
या दोन्ही प्रकरणातील गुन्ह्यांची पद्धत एकसारखी होती. मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकाने या टोळीचा शोध घेऊन शिवडी येथे सापळा लावून अकील खान, इस्माईल शेख आणि मोहम्मद शहा अशा तिघांना अटक केली. पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनकर भोसले, दिलीप फुलपगारे, नितीन पाटील, लक्ष्मीकांत साळुंखे, चंद्रकांत दळवी, सुनिल माने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.