दिल्लीवरून नवी मुंबईत येऊन घरफोडी करणाऱ्या टोळीतील दोन जणांना नवी मुंबई गुन्हे शाखेने बोरिवली येथून जेरबंद केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही टोळी नवी मुंबईत कार्यरत होती. या टोळीकडून सुमारे साडेपाच लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
नवी मुंबईत घरफोडी करणाऱ्या टोळीतील काही जण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दिल्लीला पळून जाणाच्या तयारीत फरमानअली मेहेरबान अन्सारी आणि लतिफ ताजमोहमद खान या दोघांना बोरिवली रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली.
आरोपींकडून अधिक चौकशी केली असता, तुर्भे आणि नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ७ घरफोडीच्या गुन्हय़ांची उकल त्यांच्याकडून झालेली असून त्यातील २९० ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५ लाख ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली आहे.
ही टोळी २०१२पासून नवी मुंबईत घरफोडी करत आहे. नवी मुंबईत येताना दिल्लीवरून विमानाने येत असे आणि जाताना घरफोडीतील माल असल्याने रेल्वेने दिल्लीला जात असल्याचे त्यांनी सांगितले.