पाच दुचाकी लंपास, मंदिराची दानपेटी फोडली
लाखोंचा माल पळविणाऱ्या दरोडेखोरांना अटक
शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत असून वाहनचोरी, मंदिरातील दानपेटी लंपास करणे, दरोडा, दागिने लांबविणे या घटनांची जणू मालिका सुरू असल्याचे दिसत आहे. या घटनाक्रमामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मालमोटारीसह लाखो रुपयांचा माल लंपास करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले.

गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी आडगाव ट्रक टर्मिनसमधून मालमोटार गायब झाली होती. सोमवारी रात्री पुन्हा तसाच प्रकार घडला. औरंगाबाद रोडवरील मानुर शिवारात मनोहर कालिदास सुरे यांची मालमोटार एका टोळक्याने अडविली. त्यांना व क्लीनरला चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ केली. दोघांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाणीचा प्रयत्न झाला. या वेळी चोरटय़ांनी मालमोटारीतील १६ लाख, ३५ हजार रुपये किमतीच्या सिमेंट गोण्या व सात हजार रुपये ताब्यात घेत पलायन करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी पोलीस गस्त घालत असल्याने चोरटय़ांना पकडण्यात आले. इम्रान मुश्ताक शेख, अक्षय गोसावी, बाळू इंदोरे, रूपेश भालेराव, हशीम मणियार, जाकीर काझी यांना मुद्देमालासह अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. चोरटय़ांनी आता मंदिराकडे नजर वळविली आहे. विनयनगर परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिरात मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास गणेश ऊर्फ मयूर शिंदे, फारूख इरफान शेख या संशयितांनी दानपेटी फोडून १२०० रुपये लंपास केले. हा प्रकार पाहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर संशयितांना अटक करण्यात आली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर रस्त्यावरील जुना गंगापूर नाका येथे प्रभू इलेक्ट्रिक व मोबाइल दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला. या भागात काही महिन्यांपूर्वी तीन ते चार दुकाने फोडण्यात आली होती. त्याचा तपास लागला नसताना पुन्हा अशी घटना घडत असल्याने व्यापारी वर्ग धास्तावला आहे.
मेळा स्थानकात दागिने गायब करण्याचा प्रकार घडला. कौशाबाई फकिरराव मोटकरी व कुसुम गोराणे या बसमध्ये चढत असताना चोरटय़ांनी त्यांच्याकडील सोन्याची पोत व डोरले लंपास केले. शहर परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून पाच दुचाकी चोरीस गेल्याची नोंद वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत झाली आहे. कालिकानगर परिसरातील रहिवासी भालचंद्र डांगे यांची दुचाकी निवासी संकुलाच्या आवारातून चोरटय़ांनी गायब केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुरगाणा तालुक्यातील ललित देशमुख काही कामानिमित्त बोरगड येथील गिरिराज अपार्टमेंटमध्ये नातेवाइकांकडे आले होते. रात्री चोरटय़ाने इमारतीच्या वाहनतळातून त्यांची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटीसेंटर मॉलसमोर उभी केलेली नितीन विसपुते यांची दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सातपूरच्या जाधव संकुल परिसरात सोनाई अपार्टमेंटमध्ये राहणारे रतन सांगळे यांची मोटारसायकल मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी लंपास केली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड येथे याच घटनेची पुनरावृत्ती घडली. मारुती संकुल येथील रहिवासी योगेश डंबाळे यांची मोटारसायकल अज्ञात चोरटय़ाने घरासमोरून लंपास केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.