सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे हे राहात असलेल्या मोहोळ येथील बंगला फोडण्यात आला. परंतु यात किंमती वस्तू चोरीला गेल्या नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या गुन्ह्य़ाची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली असून सोलापूर ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रा.ढोबळे यांच्या बंगल्यास भेट देऊन गुन्ह्य़ाच्या पध्दतीचे निरीक्षण केले. चोरटय़ांची मजल पालकमंत्र्यांचा बंगला फोडण्यापर्यंत गेल्यामुळे पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री प्रा. ढोबळे हे मोहोळ येथे कुरूल रस्त्यावर सर्जेराव पाटील यांच्या बंगल्यात राहतात. याच ठिकाणी त्यांचे संपर्क कार्यालय असल्याने नागरिक व कार्यकर्ते पालकमंत्र्यांना भेटायला येत असतात. गेल्या काही दिवसांपासून ढोबळे कुटुंबीय या बंगल्याकडे फिरकले नव्हते. या बंगल्याच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस रखवालदार तैनात असतो. गेल्या २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातपासून प्रा. ढोबळे यांचा बंगला बंद होता. गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बंगला फोडण्यात आल्याचे रखवालदार ज्ञानदेव कुंडलिक डोलारे (वय ४२, रा. गोटेवाडी, ता.मोहोळ) यांच्या निदर्शनास आले. बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे व आतील दरवाजाचे कुलूप चोरटय़ांनी तोडून आत प्रवेश मिळविला. बंगल्यातून किमती सामान हाती लागण्याच्या आशेने चोरटय़ांनी प्रयत्न केले. परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला. खोल्यांमधील सामान अस्ताव्यस्त पडले होते. चोरटय़ांना रिकाम्या हाताने परत जावे लागल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. या गुन्ह्य़ाचा प्रकार उघड होताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही प्रा.ढोबळे यांच्या बंगल्यास भेट देऊन चोरीच्या पध्दतीचे निरीक्षण नोंदविले.  

 
कोल्हापुरात मालमत्ता
कर तपासणी मोहीम
प्रतिनिधी, कोल्हापूर    
कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा, परवाना, मिळकत, पाणीपुरवठा व स्थानिक संस्था कर विभागाच्यावतीने शहरातील विविध भागात गुरूवारी धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामधून लाखो रूपयांचा कर वसूल करण्यात आला. तर, स्थानिक संस्था कर विभागाकडे २८ लाख ३८ हजार रूपये इतका कर जमा झाला. ही मोहीम महाद्वार रोड, ताराबाई रोड या परिसरामध्ये राबविण्यात आली.    
परवाना विभागाच्यावतीने ७२ व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली. त्या वेळी १० व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्याने त्यांचे व्यवसाय बंद करण्यात आले. या मोहिमेत परवाना विभागाकडे १ लाख ५ हजार इतके परवाना शुल्क जमा झाले.    
मिळकत विभागाच्यावतीने महालक्ष्मी मार्केट, गायकवाड वाडा, कपीलतीर्थ मार्केट या ठिकाणी ७०केबीन व ४० दुकानगाळे तपासण्यात आले. त्यातून १ लाख १६ हजार रूपये वसूल करण्यात आले.घरफाळा विभागाच्यावतीने याच परिसरात १०२ मिळकतींची तपासणी करण्यात आली. ५ लाख ६८ हजार रूपये इतका घरफाळा वसूल करण्यात आला. स्थानिक संस्था कर विभागाच्यावतीने ५० मिळकती तसेच फेरीवाले यांची माहिती घेण्यात आली. या तपासणीमुळे २८ लाख ३८ हजार रूपये इतका कर या विभागाकडे जमा झाला.
 

 
 
वैरागजवळ शालेय दलित
मुलीवर बलात्कार
प्रतिनिधी, सोलापूर
बार्शी तालुक्यातील घाणेगाव येथे एका अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ज्योतिराम बाळासाहेब सपकाळ (वय २४, रा. साकत, ता. बार्शी) याच्याविरूध्द वैराग पोलिसांनी बलात्कारासह अॅट्रासिटी अॅक्ट तसेच बाल संरक्षण हक्क कायदा २०१२ खाली गुन्हा दाखल केला आहे.
सदर पीडित मुलगी १६ वर्षांची असून ती माध्यमिक शाळेत शिकते. तिच्या घरात ज्योतिराम हा ट्रॅक्टरचे भाडे मागण्याच्या निमित्ताने येत असे. यातूनच त्याने या शालेय मुलीबरोबर सलगी करून तिला आमिष दाखवले. त्याने पीडित मुलीच्या घरात ती एकटी असताना तिच्यावर बलात्कार केला,असे पोलीस फिर्यादीत स्वत: पीडित मुलीने नमूद केले आहे. या गुन्ह्य़ाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिदास पवार हे करीत आहेत.

 
 
बनावट कागदपत्रांच्या आधारे
१३ एकर शेतजमीन लाटली
प्रतिनिधी, सोलापूर
बनावट निवडणूक मतदार ओळखपत्रासह इतर दस्तऐवज तयार करून त्या आधारे एका गरीब शेतकऱ्याची १३ एकर शेतजमीन खरेदी करून त्याची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह सहा जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बार्शी तालुक्यातील वैराग येथे खरेदी-विक्री कार्यालयात हा प्रकार घडला. यात आरोपींविरूध्द फसवणुकीच्या गुन्ह्य़ातील कलमांच्या तरतुदींसह राष्ट्रीय बोधचिन्ह वापर परवाना कायद्यातील कलम लावण्यात आले आहेत.
बंडू रामा साळुंखे (वय ३०, रा. मेळेगाव, ता. बार्शी) असे फसले गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी मरगू इटकर, अविनाश जरिचंद इंगोले (दोघे रा. मळेगाव) तसेच अन्य तीन पुरूष व एका महिलेविरूध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील शिवाजी इटकर व अविनाश इंगोले यांना अटक करण्यात आली आहे. फसवणूक करून हडप करण्यात आलेल्या शेतजमिनीची किंमत १२ लाख २५ हजार एवढी दर्शविण्यात आली आहे. पोलीस फिर्यादीनुसार शिवाजी इटकर व अविनाश इंगोले यांनी बंडू साळुंखे यांची शेतजमीन हडप करण्याच्या हेतूने त्यांचे, तसेच त्यांचे भाऊ व सावत्र आई यांच्या नावाने तीन अज्ञात पुरूष व एका महिलेचे छायाचित्र वापरून बनावट निवडणूक मतदार ओळखपत्र केले. त्या आधारे आपणच शेतमालक आहोत असे भासवून वैराग येथील खरेदी-विक्री कार्यालयात खोटी कागदपत्रे तयार करून साळुंखे यांची १३ एकर शेतजमीन १२ लाख २५ हजारास खरेदी दिल्याचा व्यवहार केला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साळुंखे यांनी पोलिसात धाव घेतली.