दिवाळी सणामुळे नागरिक मोठय़ा संख्येने खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. हीच संधी साधून सराईत चोर दिवसाढवळ्या नागरिकांनी खरेदी केलेल्या ऐवजांवर डल्ला मारून पसार होत आहेत. गेल्या दोन दिवसांत कल्याण-डोंबिवलीत चोरटय़ांनी पाच महिलांना गुंगारा देऊन सुमारे चार लाखांचा ऐवज लुटला आहे.  कल्याण-डोंबिवलीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकरणाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. दुचाकीवरून वेगाने येणारे हे चोरटे पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवू लागले आहेत.   आजदे गावातील शारदा वसंत पाटील या महिलेला घरडा सर्कल चौकात गाठून चोरटय़ांनी तिच्या गळ्यातील सहा तोळ्याचे ९० हजारांचे मंगळसूत्र लांबवले. लोढा हेवन भागात राहणाऱ्या आराधना उपाध्याय या महिलेचे मंगळसूत्र व सोनसाखळी असे ९० हजारांचे दागिने चोरून नेले, तर कल्याणमधील खडकपाडा येथील अश्विनी वाळंज यांचे २७ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबविले. याच भागातून जाणाऱ्या डोंबिवलीतील शोभा मराठे एक कार्यक्रम उरकून रिक्षेत बसण्यासाठी जात होत्या. दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पोबारा केला. कल्याणमधील मुथा ज्वेलर्समध्ये तीन बुरखाधारी महिला आल्या. त्यांनी नोकराची नजर चुकवून ९० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगडय़ा चोरून नेल्या. मालक वीरेंद्र शंकळेशा यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षभरात भिवंडी व कल्याणमधील आंबिवली येथील वस्तीमधून या भुरटय़ा चोरांना ठाणे, कल्याणच्या पोलिसांनी अटक केली आहे. गस्तीवरील पोलिसांचा अंदाज घेऊन हे सराईत चोर वावरत असल्याचे बोलले जाते.