दहीहंडी फोडायला श्रीकृष्ण वर चढणार तोच श्रीकृष्ण ही ‘द ई हंडी’ फोडण्यासाठी तयारच झाला नाही आणि मग वर चढता चढता तो खाली घसरला. राष्ट्रीय महामार्ग आणि त्या महामार्गावरील अडथळयांची शर्यत पार करण्यासाठी गेलेला रोबो तिथेच अडकला आणि खाली घसरला. ही सर्व करामत रामन विज्ञान केंद्रात विद्यार्थ्यांच्या तालावर सुरू होती. अशी काही करामत म्हटली की समोर फक्त अभियांत्रिकीचेच विद्यार्थी येतात, पण ही करामत शुक्रवारी पाचव्या ते दहाव्या वर्गातल्या चिमुकल्यांनी करून दाखवली.
शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये ‘रोबोटिक्स’ची आवड आणि विज्ञानाबाबत गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने रामन विज्ञान केंद्रातर्फे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ‘रोबो ऑलिम्पिक्स-२०१५’ आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत ‘द ई-हंडी’ ही स्पर्धाही आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी तयार केलेले ‘रोबो’ ही हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. रोबोमार्फत दहीहंडी फोडण्यासह रोबोट्सच्या शर्यतीचा आनंद विद्यार्थी या स्पध्रेच्या निमित्ताने लुटत आहे. ‘रोबो ऑलिम्पिक्स-२०१५’च्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमधल्या उत्साहाची प्रचिती येत होती. रामन विज्ञान केंद्रातर्फे विद्यार्थ्यांच्या हातात रोबोट दिल्या गेले. या रोबोटच्या सहाय्याने हे विद्यार्थी ‘रोबो शर्यत’, ‘द ई-हंडी’चा आनंद लुटत होते. कधी हा रोबो सरळ जाण्याऐवजी वेगळयाच वळणाने जात होता, तर कधी खाली पडत होता. ‘द ई-हंडी’साठी विद्यार्थ्यांनी या रोबोवर श्रीकृष्णाची प्रतिकृती तयार केली आणि हा श्रीकृष्ण ही हंडी फोडणार, तोच हा श्रीकृष्ण समोर जायला तयार होईना. क्षणभर विद्यार्थीही गोंधळले आणि नंतर श्रीकृष्ण या मोहिमेसाठी तयारच नसल्याचे त्याच्या लक्षात आले. इकडे धाव, तिकडे धाव, इकडे पळ, तिकडे पळ असे करत कसेतरी श्रीकृष्ण मोहिमेसाठी सज्ज झाला आणि श्रीकृष्णाने हंडी फोडली. रोबो शर्यतीतही कित्येक अडथळयांची शर्यत विद्यार्थ्यांना पार पाडावी लागली. कधी हा रोबो रस्त्याच्या कडेला तर कधी रस्त्याच्या खाली उतरत होता आणि मग विद्यार्थ्यांची भंबेरी उडत होती. मात्र, ही रोबो शर्यतही त्यांनी यशस्वी केली. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘रोबो प्रतिकृती’ यावेळी ठेवण्यात आल्या होत्या. यात पाचवीच्या विद्यार्थ्यांचासुद्धा सहभाग होता. शालेय विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम यावेळी खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचे दिसून येत होते.