गाडीत प्रवास करीत असताना किंवा सुटीच्या काळात रुबिक क्युबचे कोडे सोडविण्याचा छंद अनेकांना असतो. पण हे कोडे जर एखादा रोबो सोडवत असेल तर..? असा एक रोबो दत्ता मेघे महाविद्यालयातील विद्यार्थी अमेय सुतवणी याने तयार केला आहे.
अमेयचा ‘क्युबर’ नावाचा रोबो डेव्हिड गिल्डे यांनी तयार केलेल्या ‘माइंड क्युबर रोबो’च्या कुटुंबातीलच आहे. गिल्डे यांनी ‘स्पीड क्युब’ या स्पध्रेसाठी हा रोबो विकसित केला होता. सध्या हा रोबो एनएक्सटी २.० या आवृत्तीमध्ये काम करीत आहे. पण अमेयने यातील मूळ अल्गोरिदममध्ये काही बदल करून एनएक्सटीच्या तिसऱ्या आवृत्तीमध्ये चालणारा रोबो तयार केला आहे. त्याचा रोबो गिल्डेच्या रोबोपेक्षा थोडा वेगळय़ा पद्धतीने काम करतो. गिल्डेचा रोबो हा एक एक लेअर सोडवत जातो. पण अमेयचा रोबो कोपऱ्यापासून सुरुवात करतो.
या रोबोच्या सीपीयूचे बटण सुरू केले की, रुबिक क्युब मशीनमधील ट्रेमध्ये ठेवण्यात येतो. यानंतर ट्रेसमोर बसविण्यात आलेल्या सेन्सर मशीनला क्युब ठेवण्यात आल्याचा संदेश मिळतो. यानंतर मशीनच्या वरच्या बाजूस बसविलेले कलर सेन्सर त्याच्या दिशेला असलेल्या बाजूचे नऊ चौकोन स्कॅन करू लागतात. हा क्युब या मशीनमध्ये अशा प्रकारे फिरतो की त्याच्या सहाही बाजूंचे स्कॅनिंग होऊन रंगानुसार ते जुळविले जातात. हे चौकोन जुळविण्यासाठी ‘कोसिम्बा अल्गोरिदम’ वापरण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रिया क्यूब २० वेळा फिरवून पूर्ण केली जाते.
गिल्डेने तयार केलेल्या रोबोने नुकताच एक विश्वविक्रम केला आहे. विविध कठीण प्रॉब्लेम्स सोडविण्यासाठी छोटय़ा हार्डवेअरचा वापर कसा होऊ शकतो हे दाखविण्याचे काम प्रामुख्याने या प्रयोगाच्या माध्यमातून होत असल्याचे दत्ता मेघे महाविद्यालयात संगणकीय अभियांत्रिकी शाखेत तृतीय वर्षांत शिकत असलेला अमेय सांगतो. पाठय़पुस्तकीय अभ्यासाला जोड देताना विविध कला गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने हे प्रयोग उपयोगी ठरत असल्याचेही तो सांगतो. यामध्ये आपल्याला आपल्या नियमित अभ्यासासोबतच नवीन संकल्पना शिकावयास मिळत असल्याचेही तो सांगतो.