दादरच्या शिवाजी पार्कमध्ये पर्यटकांकरवी होणारा कचरा गोळा करण्याचे काम येत्या गुरुवारपासून चक्क रोबोवर सोपविण्यात येणार आहे. शिवाजी पार्कमधील ठरावीक भागात एक रोबो फिरत राहणार असून कचरा टाकण्यासाठी एखादी व्यक्ती समोर येताच त्याचे झाकण खुले होईल. कचरा गोळा करीत हा रोबो त्याला नेमून दिलेल्या परिसरात संचार करीत राहणार आहे. या प्रयोगाचे यश लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने मुंबईतील उद्यानांमधील सफाईची जबाबदारी एकेका रोबोवर सोपविण्याचा पालिकेचा मानस आहे.

मुंबईमधील उद्यानांमध्ये विरंगुळ्यासाठी मोठय़ा संख्येने पर्यटक येत असतात. कचराकुंडय़ांची संख्या कमी असल्याने किंवा कचराकुंडीपर्यंत उठून जाण्याचा कंटाळा करणारे अनेक पर्यटक उद्यानातच कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, उद्यानांमध्ये होणारा कचरा वारंवार साफ करण्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष धुरी यांनी एस. के. रोबोट कंपनीचा रोबो तेथे तैनात करण्याची कल्पना मंगळवारी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यापुढे मांडली. पालिका मुख्यालयात आयुक्तांपुढे या रोबोचे सादरीकरण करण्यात आले.
या सादरीकरणानंतर सीताराम कुंटे यांनी दादरमधील शिवाजी पार्क आणि सानेगुरुजी उद्यानात प्रत्येकी एक रोबो तैनात करण्याची परवानगी एस. के. रोबोट कंपनीला दिली आहे. या कंपनीने हे दोन्ही रोबो विनाशुल्क पालिकेला उपलब्ध केले आहेत. एक महिना प्रायोगिक तत्त्वावर रोबोची कामगिरी पाहण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईतील महत्त्वाच्या उद्यानांमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी हा रोबो तेथे तैनात करण्यात येणार आहे.

रोबो असा गोळा करणार कचरा
एस. के. रोबोट कंपनीच्या रोबोला उद्यानातील ठरावीक भाग नेमून देण्यात येणार आहे. या भागत हा रोबो सतत संचार करीत राहणार आहे. या परिसरात बसलेली एखादी व्यक्ती कचरा टाकण्यासाठी रोबोसमोर उभी राहिल्यास त्याचे झाकण आपोआप उघडेल. कचरा टाकून झाल्यावर झाकण बंद होईल आणि रोबोचा संचार सुरू होईल. या रोबोवर सेन्सर बसविण्यात आला आहे. त्यामुळे व्यक्ती समोर येताच त्याचे झाकण उघडेल आणि बंदही होईल.