आपल्या रोखठोक भाषणांमुळे तरुणांमध्ये आकर्षण असलेल्या राज ठाकरे यांच्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’मधील (मनसे) ‘गोतावळी’ राजकारणाची बाधा संघटनेची विद्यार्थी आघाडी असलेल्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’लाही झाल्याची कुजबुज सुरू झाली असून मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या निमित्ताने युवकांमधील ही धुसफुस समोर आली आहे.
पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले मनविसेचे मुंबई विद्यापीठात सुधाकर तांबोळी आणि गणेश जाधव हे दोनच सदस्य आहेत. मात्र, या सदस्यांना विश्वासात न घेताच आगामी अधिसभा निवडणुकीचे डावपेच आखले जात असल्याची चर्चा आहे.
विधानसभा, लोकसभा निवडणुकांमधील अपयशामुळे मनसे खूप मागे पडली आहे. त्यामुळे, विद्यापीठांच्या अधिसभा निवडणुकांकरिता मनविसे आतापासूनच कामाला लागली आहे. त्यासाठी इच्छुकांची नावे पडताळण्यात येत आहेत. संघटनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर अधिसभा निवडणुकीच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. मात्र, या सर्व प्रक्रियेपासून पक्षाच्या अनुभवी व अधिसभेतील सदस्यांना वगळण्यात येत आहे. मनविसेचे ३०-३५ उपाध्यक्ष आहेत. परंतु, काही ठरावीक उपाध्यक्ष वगळता कुणीच फारसे कार्यरत नाहीत. जे पदाधिकारी काम करतात त्यांना बाजूला सारून त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना पक्षाचे वरिष्ठ नेते जाणूनबुजून गैरहजर राहत असल्याची तक्रार आहे.
या संदर्भात तांबोळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी कोणतीच बैठक झाल्याचे आपल्याला माहीत नाही, असे सांगितले. तर शिरोडकर यांना विचारले असता त्यांनी आपण अशी कुठलीही बैठक अधिकृतपणे घेतली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, काही पदाधिकाऱ्यांशी आपण वैयक्तिकपणे संवाद साधत आहोत. पक्षाचे अध्यक्ष म्हणून आपले ते कामच आहे. त्यात जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना दुखविण्याचा प्रश्न येतच नाही, अशा शब्दांत त्यांनी या चर्चेला आपल्या बाजूने पूर्णविराम दिला.
..तर आम्ही जायचे कुठे?
या कार्यकर्त्यांचे वय झाल्याने त्यांनी आता विद्यार्थी संघटनेपासून दूर राहून मधल्या फळीत काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जशी शिवसेनेत ‘युवा सेना’ आहे तशी संघटना मनसेत कुठे आहे? त्यामुळे विद्यार्थी संघटनेच्या कामातून बाहेर पडायचे तर जायचे कुठे, असा सवाल एका नाराज पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर केला.