कल्याणपल्याड चौथ्या मुंबईचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून झपाटय़ाने विकसीत होत असलेले बदलापूर शहर टोल फ्री चौपदरी रस्त्यांनी जोडले जात असतानाच आता शहराच्या अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठीही शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानातून शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी राज्य शासनाने तब्बल ५० कोटी ९२ लाख रूपयांच्या योजनेस नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यातील ८० टक्के निधी राज्य शासन अनुदान म्हणून देणार असून उर्वरित २० टक्के खर्च बदलापूर पालिकेस करावा लागणार आहे.  
मुंबई परिसरात तुलनेने किफायतशीर किंमतीत घरे उपलब्ध असल्याने बदलापूर शहराचे झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. या वाढत्या लोकवस्तीचा शहरातील नागरी सुविधांवर अतिशय ताण पडत असून त्यांना पुरेशा सुविधा पुरवणे पालिकेला शक्य होत नाही. त्यामुळे विशेष बाब म्हणून या शहराच्या पायाभूत सुविधांसाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी नगरविकास विभागाकडे केली होती. रस्ते विकास प्रकल्पासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने ती मागणी मान्य केली. या प्रकल्पांतर्गत शहरातील दहा प्रमुख अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड आणि पथदिवे या कामांचा समावेश आहे. गांधी चौक ते शिवाजी चौक, रेल्वे गेट ते गांधी चौक, पालिका कार्यालय ते एमआयडीसी, गांधी चौक ते तलाठी कार्यालय, अजय राजा हॉल ते स्वामी समर्थ चौक, मोहनानंदनगर पूल ते जॉम्गर्स पार्क, शिवाजी चौक ते एमआयडीसी, मोहनानंदनगर ते वालिवली, गांधी टेकडी ते मोहनानंदनगर पूल, रेल्वे स्थानक ते कात्रप डी.पी. रस्ता हे दहा रस्ते आता काँक्रिटचे होणार आहेत.