राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत गणेश ऊर्फ मामा सावरकर यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. मामा सावरकर सुमारे ७५ वर्षे रा. स्व. संघ, जनसंघ, विद्यार्थी परिषद तसेच ‘माय होम इंडिया’ आदी संघटनांमध्ये सक्रिय होते. देशभरातून मुंबईत उपचारांसाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची सोय करणाऱ्या परळ येथील ‘नाना पालकर स्मृती समिती’चे ते संस्थापक सदस्य होते. सुमारे १५ दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नी उषाताई यांचे निधन झाले होते. या दोघांनीही केलेल्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.