वारंवार मागणी करूनही महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त दिला जात नसल्याने राज्य शासनाच्या निषेधार्थ सत्ताधारी मनसेने बुधवारी पालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारास टाळे ठोकत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रभारी आयुक्त पालिकेत बंदीस्त झाले तर अधिकारी व कर्मचाऱ्यांना आतमध्ये प्रवेश करणे अवघड झाले. विकास कामे रखडल्याच्या मुद्यावरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी आयुक्तांनाही धारेवर धरले. अखेर महापौरांनी मध्यस्ती करून महापालिकेमार्फत मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट घेऊन पूर्णवेळ आयुक्त मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे सांगितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. कामे होत नसल्याचे खापर आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या डोईवर फुटू नये, याकरिता मनसेने आपलीच सत्ता असणाऱ्या पालिकेत आंदोलन करत या प्रश्नाला शासन जबाबदार असल्याचे दर्शविण्याची धडपड केली.
लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तेव्हापासून हे पद रिक्त असून त्याचा अतिरिक्त कार्यभार आदिवासी विकास विभागाचे आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. वॉर्डातील कमी खर्चाचे प्रस्ताव वा फाईलवरही हे आयुक्त स्वाक्षरी करीत नसल्याची मनसेच्या नगरसेवकांची खदखद आहे. शेकडो फाईल आयुक्तांकडे पडून असल्याचा आरोप करत पूर्णवेळ आयुक्त नसल्याने धोरणात्मक निर्णयात अवरोध निर्माण झाल्याची मनसेची तक्रार आहे. यामुळे सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर करावयाच्या कामांवरही विपरित परिणाम झाला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी त्या अनुषंगाने दोन पत्र शासनास पाठविली. आठ दिवसात पूर्णवेळ आयुक्त दिला जाईल हे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळले नाही. त्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी मनसेचे नगरसेवक बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास राजीव गांधी भवन या मुख्यालयात जमा झाले. तत्पुर्वी, प्रभारी आयुक्त संजीव कुमार हे आपल्या दालनात निघून गेले होते. सभागृह नेता शशिकांत जाधव, स्थायी समिती सभापती राहुल ढिकले, नगरसेविका सुजाता डेरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या नगरसेवकांनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारास टाळे ठोकत ठिय्या दिला. राज्य शासनाचा धिक्कार असो, पूर्णवेळ आयुक्त मिळालाच पाहिजे, आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
दरम्यानच्या काळात महापौरांनी पालिकेत धाव घेतली. त्यांना आतमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. मनसेच्या शिष्टमंडळाला घेऊन ते प्रभारी आयुक्तांच्या दालनात गेले. जाधव, डेरे यांनी रखडलेल्या कामांवरून त्यांना जाब विचारला. महापौरांनी प्रभारी आयुक्तांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पूर्ण वेळ आयुक्तांचा विषय शासनाच्या अखत्यारीत असल्याचे त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले. प्रभारी आयुक्तांनी कोणतीही विकास कामे रखडणार नसल्याचे आश्वासन दिल्यानंतर मनसेचे शिष्टमंडळ आंदोलन मागे घेण्यास तयार झाले. त्यानंतर मुख्यालयाच्या दरवाजाचे टाळे काढून तो खुला करण्यात आला.

टिळक जयंतीच्या कार्यक्रमासही विलंब
महापालिकेच्यावतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन राजीव गांधी भवन येथे करण्यात आले होते. परंतु, सत्ताधारी मनसेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे या कार्यक्रमास विलंब झाला. साधारणत: पाऊण तास आंदोलन चालले. हे आंदोलन झाल्यावर महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, आयुक्त डॉ. संजीव कुमार, स्थायी सभापती राहुल ढिकले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शासनाचा शहरात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न
पालिकेत मनसेची सत्ता असल्याने राज्य शासन शहरात आम्हाला विकास कामे करता येणार नाही या पध्दतीने अडवणूक करते. अडीच वर्षांत महत्वपूर्ण प्रश्नावर शासनाकडे दाद मागुनही दखल घेतली जात नाही. विधानसभा निवडणुकीची लवकर आचारसंहिता लागू होणार आहे. पूर्णवेळ आयुक्त न मिळाल्यास विकास कामांसह सिंहस्थाची कामे रखडून पडतील. राज्य शासनाचा शहरात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आठ दिवसात पूर्ण वेळ आयुक्त न मिळाल्यास प्रभारी आयुक्तांना महापालिकेत बंदी घातली जाईल.
शशिकांत जाधव, (सभागृह नेता)

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळले नाही
मुख्यमंत्र्यांकडे दोन वेळा पत्राद्वारे व एकदा प्रत्यक्ष भेट घेऊन महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसात पूर्णवेळ आयुक्त देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप ते पूर्ण झालेले नाही. शहरातील विकास कामे आणि सिंहस्थाच्या नियोजनावरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. या संदर्भात पुन्हा शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.
अ‍ॅड. यतिन वाघ (महापौर)

आर्थिक स्थिती पाहून विकास कामे
विकास कामे प्रलंबित ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न नाही. पालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन
विकास कामांचा विचार करावा लागतो. मान्सूनपूर्व कामे सुरू झाली आहेत. अन्य कामे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.
डॉ. संजीव कुमार (प्रभारी आयुक्त)

मनसेइतकेच राज्य शासनही दोषी
महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त हवा याबद्दल कोणाचेही दुमत नाही. पण, चार महिने पालिकेला पूर्णवेळ आयुक्त नसताना मनसेने काही केले नाही. पालिकेतील सत्ताधारी मनसेचे तीन आमदार आहेत. या प्रश्नासाठी मनसे पदाधिकाऱ्यांना आंदोलन करावे लागते ही बाब सत्ताधाऱ्यांचे अपयश दर्शविणारी आहे. पालिकेला कोण आयुक्त द्यावा ही शासनाच्या अखत्यारीतील बाब आहे. पण, तीन महिने स्वाक्षरी होत नसल्याने मनसे इतकाच शासनाचाही दोष आहे.
गुरुमित बग्गा गटनेता (अपक्ष)

भाजप अंधारात
महापालिकेत झालेले आंदोलन हे मनसेने केलेले आहे. त्याची कोणताही माहिती भाजपला देण्यात आली नव्हती. त्यामुळे भाजपचे कोणी त्यात सहभागी झाले नाही. हे आंदोलन झाल्यानंतर त्याची माहिती समजली.
सतीश कुलकर्णी (उपमहापौर)