शहरातील गुन्हेगारी मोडून काढताना कोणताही राजकीय दबाव आणि हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचे नवीन पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी नाशिक पोलीस आयुक्तपदाचा पदभार कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडून स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
सिंहस्थाची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना शासनाने नाशिकचे पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची तडकाफडकी बदली केली. ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्दय़ावर विधीमंडळात तक्रारी झाल्यानंतर राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे. वास्तविक सिंहस्थाची धुरा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली जाणार नसल्याचे शासनाने आधी स्पष्ट केले होते. असे असताना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची आधी विनंतीवरून बदली करण्यात आली. त्यापाठोपाठ पोलीस आयुक्त सरंगल यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी नाशिक पोलीस आयुक्तपदाची सूत्रे सरंगल यांच्याकडून नवीन आयुक्त एस. जगन्नाथन यांनी स्वीकारली. यावेळी इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी जगन्नाथन यांनी सरंगल यांच्या कामाचे कौतुक केले. या पदावर कार्यरत असताना सरंगल यांनी प्रत्यक्ष ‘फिल्ड वर्क’वर भर दिला होता. कामाची ही पद्धत पुढे सुरू ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काही वर्षांपूर्वी नाशिक हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जात होते. काही राजकीय पक्षांनी गुन्हेगारीला खतपाणी घातल्याने हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलीस यंत्रणेला बरेच प्रयत्न करावे लागले. कोम्बिंग ऑपरेशन, वाहनांची तपासणी, टोळक्यांवर कारवाई या माध्यमातून गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रयत्न झाले. पोलीस तपासात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आजवरचा इतिहास आहे. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर जगन्नाथन यांनी राजकीय दबाव आणि हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. कायद्याची चौकट आणि शासनाचे धोरण यानुसार पोलीस यंत्रणा कार्यरत राहील. सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस यांच्यातील दुरावा कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे त्यांनी नमूद केले. सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. सिंहस्थात जवळपास ८० लाख भाविक शहरात दाखल होणार आहेत. सिंहस्थाच्या तयारीबाबत त्यांनी काही बोलण्यास असमर्थता दर्शविली. सिंहस्थ कुंभमेळा हा अतिशय मोठा उत्सव आहे. देश-विदेशातील भाविक त्यात सहभागी होतात. या संदर्भात प्रथम आढावा घेतला जाईल असे ते म्हणाले. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान नवीन पोलीस आयुक्तांसमोर आहे.