राज्य शासनाने एसटी कामगारांच्या वेतनवाढीच्या घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करून अपेक्षित वेतनवाढ दिली नाही तर कोणत्याही क्षणी चक्का जाम करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दिला आहे.
राज्य शासनाने सुचविलेला प्रस्तावित करार हा केवळ कागदावर असून कामगारांना प्रत्यक्षात अपेक्षित वेतनवाढ मिळाली नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कनिष्ठ कामगार आणि कायम कामगार यांच्यात या करारातील मसुद्यामुळे भेदाभेद झाला आहे. कायम कामगारांना २२.५ टक्के वाढीऐवजी केवळ १० टक्के वाढीवर समाधान मानावे लागत असून त्यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. शासनाने एसटी कामगारांना पुरेशी वेतनवाढ देण्याबाबत आपल्या निर्णयाचा फेरविचार केला नाही, तर कोणत्याही क्षणी एसटीची चक्का जाम करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण आणि सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी दिला आहे.