ठाणेकरांचा रिक्षा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी ठाणे पोलिसांनी आखलेल्या ‘ट्रफिक स्मार्ट आयडी’ या योजनेचा शुभारंभ गुरुवारी अभिनेत्री मृणाल दुसानिस यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे महिला प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकेल, असा आशावाद यावेळी दुसानिस यांनी व्यक्त केला. ठाणे पोलिसांनी दिलेल्या या ओळखपत्रात ‘सुरक्षा कोड’ देण्यात आला आहे. प्रवाशांनी मोबाइलमध्ये ‘सेफ जर्नी’ नावाचे अप्लीकेशन डाऊनलोड करावे आणि त्या आधारे हा सुरक्षा कोड स्कॅन करताच काही क्षणात रिक्षाचालकाची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी गुरुवारी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मृणाल दुसानीस बोलत होती. ‘स्मार्ट कार्ड आयडी’ या उपक्रमामुळे नागरिकांचा प्रवास सुरक्षित होईल. त्यामुळे ज्या रिक्षात कार्ड त्याच रिक्षातून प्रवास करा आणि ही योजना इतर शहरातही लागू करावी, असे मतही तिने व्यक्त केले. सुरक्षित वाहतूक संकल्पना आपल्याकडे खासगी तसेच सार्वजनिक वाहतुकीत अजूनही मुरलेली नाही. परदेशातील योजना ऐकतो मात्र, प्रत्यक्षात काहीच करत नाही. आस्ट्रेलिया आणि अमेरिकेत टेक्नालॉजी नव्हती, त्यावेळीही सुरक्षित वाहतूक संकल्पना रुजलेली होती, असे सांगत आपल्या समाजात ही मानसिकता कधी येणार, असा सवाल पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी उपस्थित केला. महिलांना असुरक्षित वाटते, ही बाब पोलिसांसाठी भूषावह नाही. त्यामुळे आता सर्वानीच मानसिकता बदलली पाहिजे. महिलांमध्ये सुरक्षित असल्याची भावना निर्माण करण्याचे काम पोलिसांचे असून ते आमचे कर्तव्यच आहे. पण, समाजाचीही तितकीच जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच आपण कर्तव्याची व्याख्या बदलून महिलांमध्ये सुरक्षितता कशी वाटेल, यावर आता विचार करायला हवा, असेही मत त्यांनी व्यक्त केले. ‘ट्रॅफिक स्मार्ट आयडी’ या उपक्रमात नागरिकांना तात्काळ मदत करावी आणि ही जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे आदेशही त्यांनी यावेळी वाहतूक शाखेला दिले. या कार्यक्रमाप्रसंगी सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील, स्वप्नाली लाडचे काका-काकू यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि रिक्षाचालक उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात शहरातील सुमारे पाच हजार रिक्षांमध्ये ‘ट्रॅफिक स्मार्ट आयडी’ बसविण्यात आले असून रिक्षात प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी म्हणजेच चालकाच्या आसनाच्या पाठीमागील बाजूस हे ओळखपत्र बसविण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित रिक्षांमध्ये हे ओळखपत्र बसविण्यात येणार आहे.
दोन वर्षांपासून ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे महिलांना असुरक्षितता जाणवू लागली आहे. रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारायला जाण्याची मलाही भीती वाटते. अशीच भीती ५ ते ५० वयोगटातील महिलांच्या मनात असते, असे मत मराठी अभिनेत्री मृणाली दुसानीस हिने कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. तसेच ठाणे वाहतूक पोलिसांमार्फत रिक्षामध्ये बसविण्यात येणाऱ्या ‘ट्रॅफिक स्मार्ट आयडी’ या उपक्रमामुळे महिलांना सुरक्षित असल्याची जाणीव होण्यासाठी काहीसा आधार मिळणार आहे, असेही तिने स्पष्ट केले.