पर्यावरणात विलक्षण वेगाने बदल घडत आहे. हा बदल मानवी जीवनावर परिणाम करीत आहे. त्यामुळे निर्माण होत असलेले पेच, समस्या याचे चित्रण या पुढील काळात साहित्यातून उमटणे गरजेचे आहे. त्यासाठी साहित्यिकांनी वास्तव प्रश्नांना भिडण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी केले.
मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेतर्फे तयार केलेल्या साहित्य उत्सव दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ. नागरगोजे, साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. मसापचे अध्यक्ष नितीन तावडे यांची उपस्थिती होती. दर्जेदार अंक प्रकाशित केल्याबद्दल मसाप पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून डॉ. नागरगोजे म्हणाले, की आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा आढावा घेऊन तो तटस्थपणे मांडण्याची वेळ आली आहे. भौगोलिक बदल, त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, वातावरणातील प्रदूषण यामुळे कृषिव्यवस्थेपासून विविध घटकांची होणारी हानी या विषयांनाही साहित्यिकांनी स्पर्श करायला हवा. निर्माण होणाऱ्या प्रश्नांना भिडण्यासाठी अधिक अंतर्मुख करणाऱ्या साहित्यकृती समोर याव्यात.
प्रा. चंदनशिव म्हणाले, की देशभरात कमालीची संभ्रमावस्था आहे. बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी ती दूर केली. सोळाव्या शतकात ही भूमिका संतश्रेष्ठ तुकोबारायांनी पार पाडली. साहित्य नतिकतेशी संवाद साधत असल्यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याची त्यात मोठी ताकद असते. त्यामुळे जुनी मूल्ये टाकून नव्या मूल्यांचा अंगीकार साहित्यिकांनी करायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. सॉक्रेटिस ते दाभोलकर परंपरेचा वैचारिक आढावा घेण्याचा प्रयत्न म्हणजे अंकाच्या संपादनाचा उत्कृष्ट मानदंड असल्याची प्रतिक्रिया या वेळी सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली. राजेंद्र अत्रे, अॅड. राज कुलकर्णी, व्यंकटेश हंबिरे यांनीही मनोगत व्यक्त केले. बालाजी तांबे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र केसकर यांनी सूत्रसंचालन केले.