चिपळूण तालुक्यातील सह्याद्री कला महाविद्यालयात दर्जेदार शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने निधीउभारणीसाठी नामवंत कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात आले आहे.
सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट (सावर्डे) या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश राजेशिर्के यांनी या उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, कोकणाच्या ग्रामीण भागात उत्तम कलाशिक्षण देत कलेचे जतन-संवर्धन करण्याचे काम संस्थेतर्फे गेली सुमारे २२ वष्रे चालू आहे. शासनमान्यताप्राप्त विविध कला अभ्यासक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, मान्यवर कलाकारांची प्रात्यक्षिके इत्यादी उपक्रम संस्थेतर्फे राबवले जातात. हे कार्य जास्त प्रभावीपणे करण्यासाठी सुसज्ज कलादालन, ओतकाम केंद्र (फौंड्री), ग्रंथालय, इमारत, विद्यार्थी कल्याण निधी इत्यादीची गरज आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय किर्तीच्या चित्रकार-शिल्पकारांनी संस्थेला दिलेल्या चित्र-शिल्पकृतींचे प्रदर्शन आणि विक्री जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आली आहे.  
ख्यातनाम चित्रकार वासुदेव कामत यांच्या हस्ते गेल्या मंगळवारी (९सप्टेंबर) या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. येत्या रविवापर्यंत (१४ सप्टेंबर) सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनात प्रभाकर बरवे, वासुदेव कामत, शिवाजी तुपे, सुहास बहुलकर, काशिनाथ साळवे, जी. एस. माजगावकर, चंद्रजित यादव, अतुल डहाके इत्यादींच्या कलाकृतींचा समावेश आहे.