देवाचे देवत्व अव्हेरायला लावणारे आपण कोण? देवावरची श्रद्धा हा ज्याच्या त्याच्या आयुष्यातील हक्काचा भाग आहे. ती श्रद्धा दूर करा आणि देवाचे देवत्व नाकारा हे तुम्हा आम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. देशभरातील साधू संतांनी रायपूरजवळ धर्मसंसद घेऊन साईबाबांचे देवत्व नाकारण्याची जी मोहीम सुरू केली, त्याच साधू संतांनी शिर्डीत ही धर्मसंसद घेऊन दाखवावी, असे आव्हान नागपुरातील वर्धा मार्गावरील साईबाबांच्या मंदिर उभारणीचा पाया असलेले बाबासाहेब उत्तरवार यांनी दिले.
‘लोकसत्ता’च्या नागपूर कार्यालयाला दिलेल्या विशेष भेटीत त्यांनी धर्म, धर्माचे राजकारण, समाजकारण अशा विविध पैलूंना हात घालत मनमोकळा संवाद साधला. साईबाबा हे संत नाहीत, त्यांना देव मानू नका, देवत्वाच्या कक्षेतून त्यांना बाहेर काढा, मंदिरातून त्यांच्या मूर्ती बाहेर काढा,  अशा मोठमोठय़ा हाकाटय़ा रायपूरजवळ झालेल्या धर्मसंसदेत देशभरातील साधू संतांनी घातल्या. त्यावरून देशभरात वादळ उद्भवले, पण देवाचे देवत्व नाकारायला लावणारे हे कोण? पोटभरू संतांच्या या हाकाटय़ा खऱ्या असत्या तर त्यांना प्रतिसाद मिळाला असता, याउलट आता साईबाबांच्या भाविकांची संख्या वाढत चालली आहे. यात तरुणाईचा सहभागही वाढत आहे. शिर्डीत अशी धर्मसंसद घेऊन त्या धर्मसंसदेत त्यांनी या अशा हाकाटय़ा घालून दाखवाव्यात आणि त्यावर मिळणाऱ्या प्रतिसादला त्यांनी सामोरे जाण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान उत्तरवार यांनी दिले.
संपूर्ण भारतातच धर्म, धर्मावरून राजकारण, समाजकारण केले जात आहे. कशाला हा गोंधळ? ज्याने त्याने आपापल्या मार्गाने जावे. धर्म, राजकारण आणि समाजकारण याची मिसळ करण्याची गरजच काय? भाविकांची साईबाबांवर श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. दानासाठी त्यांना आवाहन करण्याची गरज नाही, तर समाजाचाच एकूण कल दानशुरपणाकडे वाढत आहे. आज नागपूरच्या साईमंदिराकडे सुमारे दहा कोटी रुपये जमा आहेत, तरीही लोकांचा ओघ थांबलेला नाही. या मंदिराकडे येणारा दानाचा ओघ जेवढा आहे, तेवढाच ओघ या दानातून केल्या जाणाऱ्या लोककल्याणाचा आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके, गरिबांना ब्लँकेट्स वाटप असे काही राबवले जाणारे उपक्रम सध्या स्थगित झाले आहेत, कारण समिती प्रभारी आहे. मंदिर, मंदिराची समिती म्हटल्यानंतर थोडेफार वाद येतातच, पण हे वाद आता शमण्याच्या मार्गात आहेत. त्यामुळे लोककल्याणाचे हे उपक्रम पुन्हा सुरू होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नागपुरातील गोपाळराव बुटींनी शिर्डीत जाऊन साईबाबांचे मंदिर उभारले. नागपुरातील व्यक्ती शिर्डीत जाऊन मंदिर उभारू
शकते तर नागपुरात का नाही, हा विचार त्यावेळी मनात आला. शिर्डीवरून गुलाबबाबा आले आणि त्यांच्या येण्याने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे दिसू लागली. त्यासाठी बाबासाहेब उत्तरवारांनी मोदी नंबर दोनमधले घर विकले. वर्धा मार्गावरील भूखंडसुद्धा विकला आणि ते भाडय़ाच्या घरात राहायला गेले. साईबाबांवरील श्रद्धेपोटी त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला मित्राने साथ दिली आणि हक्काचा निवारा त्यांनी उभारून दिला. दरम्यान, त्याचवेळी मंदिराचे कामही सुरू झाले, कारण दानदात्याचा ओघही आपोआप सुरू झाला. पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या नामवंत कलावंतांनी नि:शुल्क कार्यक्रम देऊन या मंदिराच्या उभारणीत हातभार लावला. शिर्डीच्या साईबाबांची मूर्ती इटालियन मार्बलची तर नागपुरातील साईबाबांची मूर्ती राजस्थानची आहे.