रायगड जिल्ह्य़ातील नऊ शासकीय रुग्णालयात ३२ सुरक्षारक्षकांचे वेतन आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून थकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उपाशीपोटी कर्तव्य कसे बजावावे असा प्रश्न या सुरक्षारक्षकांपुढे पडलेला असताना, आरोग्य विभागाला त्याचे सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्ह्य़ातील नऊ उपजिल्हा रुग्णालयांच्या प्रवेशावर रात्रंदिवस सुरक्षेसाठी पहारा देणाऱ्या रक्षकांचा हा वेतनप्रश्न आहे. रोहा, चौक, महाड, पनवेल, माणगाव, पेण, जसवली, कुटीर श्रीवर्धन आणि कर्जत अशा रुग्णालयांमधील सुरक्षेसाठी हे कर्मचारी कार्यरत आहेत. काही ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापासून तर काही ठिकाणी गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याचे वेतन या रक्षकांना मिळालेले नाही. थकीत वेतनाच्या यादीमध्ये चार लाख ३५ हजार रुपयांचे वेतन व लेव्हीची रक्कम माणगाव येथील उपजिल्हा, रोहा येथील रुग्णालयाने दोन लाख ५५ हजार रुपये, चौक येथील रुग्णालयाने दोन लाख ३३ हजार, महाड येथील रुग्णालयाने दोन लाख ४६ हजार, पनवेल येथील रुग्णालयाने दोन लाख ३७ हजार, पेण येथील रुग्णालयाने ८२ हजार, जसवली येथील रुग्णालयाने एक लाख ३० हजार, श्रीवर्धन येथील रुग्णालयाने १ लाख ९९ हजार रुपये मंडळात जमा न केल्याने रक्षकांसह त्यांच्या कुटुंबीयांचे हाल झाले आहेत. रक्षकांना वेतन मिळण्यासाठी मंडळाच्या वतीने पाच वेळा पत्र व स्मरणपत्र आरोग्य सेवा विभागाकडे पाठविण्यात आली. पत्र व्यवहारानंतर दोन महिन्यांचे वेतन तरतूद करून पाठविण्यात आले. मात्र त्यानंतरही मागील थकीत वेतनाचा तिढा अनुदान मंजुरीनंतर सोडवू असे आरोग्य विभाग मंडळाला सांगत आहे. सुरक्षा मंडळातील रक्षकांचे वेतन थकविल्यानंतर संबंधित संस्थेमध्ये जप्तीची कारवाई करून थकीत रक्कम मिळविण्याची मंडळाची पद्धत आहे. मात्र वैद्यकीय रुग्णालय हा सरकारचा उपक्रम असल्याने त्यावर जप्ती कशी मिळवायची या विवंचनेत मंडळाचे अधिकारी आहेत. या सर्व लालफितीच्या कारभारामुळे सुरक्षारक्षकांवर मात्र उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

आम्ही सातत्याने आरोग्य विभागाच्या ठाणे येथील कार्यालयाशी संपर्क ठेवला आहे. आरोग्य विभागाच्या अलिबाग येथील अधिकाऱ्यांनाही याबाबत वेळोवेळी कळविले आहे. या कार्यालयाकडून मंडळाला केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान प्राप्त झाल्यावर रक्षकांचे वेतन देऊ असे सांगण्यात आले आहे. लवकरच यामधून मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे.
एम. एच. पवार, निरीक्षक, रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ.