सप्तरंगांची उधळण, मग ती चित्रकलेतील असो वा रांगोळीतील, पाहणाऱ्याला प्रसन्न करते. मांगल्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या रांगोळीशी तर स्त्रीचा अतिशय निकटचा संबंध. रांगोळीशी तादात्म्य पावलेली ही स्त्री सध्या विविध संकटांच्या कोलाहलात सापडली आहे. या संकटांचा धीरोदात्तपणे सामना करण्याची शक्ती तिच्या ठायी निश्चितपणे आहे. या शक्तीची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने रांगोळीकार नीलेश देशपांडे यांनी नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ‘तू दुर्गा’ या अनोख्या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
उंटवाडी रस्त्यावरील लक्षिका मंगल कार्यालयात हे प्रदर्शन होणार आहे. नाशिकमध्ये अशा संकल्पनेवर आधारित होणारे हे पहिलेच प्रदर्शन. चित्त प्रसन्न करणाऱ्या रांगोळीचा मानवी भावविश्व अन् समाजस्वास्थ्याशी संबंध आहे. ही बाब लक्षात घेऊन संकटांचा सामना करीत यशोशिखरांना गवसणी घालणाऱ्या जगभरातील भारतीय युवती व महिलांचा रांगोळीमय माहितीपट या उपक्रमाद्वारे उलगडला जाणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत अत्युच्च स्थान प्राप्त केलेल्या महिलांचे रांगोळीतील छायाचित्र अन् त्यांच्या कार्याची माहिती असे या प्रदर्शनाचे स्वरूप आहे. त्यात अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, इंदिरा गांधी, डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, कल्पना चावला, लता मंगेशकर, कविता राऊत, मेरी कोम, किरण बेदी, ऐश्वर्या रॉय-बच्चन आदी महिलांच्या कार्याचा परिचय रांगोळीच्या माध्यमातून करून देण्यात येईल.
प्रदर्शनाचे उद्घाटन २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वैद्यकीय, विधी, अभिनय, सामाजिक, शैक्षणिक, कला यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करीत आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटविणाऱ्या आठ मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त स्त्रियांच्या आत्मसन्मानाच्या या अनोख्या उपक्रमात ‘तू दुर्गा..’ हा बंध महिलांना बांधण्यात येणार आहे. याशिवाय महिलांसाठी काही खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन सर्वासाठी नि:शुल्क असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.